पालिकेला कायमचे टाळे ठोक!

पालिकेला कायमचे टाळे ठोक!
Published on: 

पालिकेला कायमचे टाळे ठोक!
किशोरी पेडणेकर यांचा महापौरांसह प्रशासनावर हल्लाबोल
मुंबई, ता. ३ : केवळ ‘मिर्झा’ या आडनावामुळे दिया मिर्झाला लक्ष्य करण्यात आले. भाजपच्या आमदाराच्या ट्वीट आणि त्यानंतर झालेल्या ट्रोलिंगपुढे महापालिका प्रशासनाने माघार घेत व्हिडिओ हटविला, असा आरोप करीत शिवसेनेने प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपच्या दबावाखाली महापालिकेचा कारभार चालणार असेल, तर पालिकेला कायमचे टाळे ठोकले पाहिजे, असा घणाघात विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केला.

महापौर रितू तावडे यांच्या कार्यपद्धतीवरही पेडणेकर यांनी जोरदार टीका केली. नागरी समस्या सोडविण्याऐवजी जाती-धर्माचे राजकारण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. आशियातील सर्वांत श्रीमंत मुंबई महापालिकेचे रूपांतर सर्कसमध्ये झाले असून, संपूर्ण कारभार विदूषकासारखा सुरू असल्याची बोचरी टीका त्यांनी केली. दिया मिर्झाच्या देशप्रेमावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या, ‘दिया मिर्झाने आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा जिंकून देशाचे नाव जगभरात उंचावले आहे. भाजपचेच तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते तिला प्रतिष्ठित ‘मदर तेरेसा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले होते. मग त्यावेळी ती देशद्रोही नव्हती का, सरकारविरोधात किंवा अन्यायाविरोधात बोलणारा प्रत्येक नागरिक देशद्रोही ठरतो का,’ प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना पेडणेकर म्हणाल्या, ‘सोशल मीडियावर ट्रोलिंग झाले म्हणून व्हिडिओ हटविल्याचे प्रशासन सांगत आहे, मात्र हे ट्रोलर्स कोण आहेत, ते भाजपच्या आयटी सेलशी संबंधित आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सेलिब्रिटींच्या माध्यमातून जनजागृती करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार महापालिकेने स्वतः अधिकृत पत्र देऊन दिया मिर्झाची संदेशदूत म्हणून निवड केली होती. असे असताना भाजपच्या दबावाखाली व्हिडिओ हटविणे ही प्रशासनाची अक्षम्य चूक आहे.’

महापौरांना अधिकार आहे का?
महापौरांनी दिया मिर्झाला ‘ब्लॅकलिस्ट’ करण्याच्या केलेल्या विधानावरही पेडणेकर यांनी आक्षेप घेतला. ‘महापौर म्हणतात, दिया मिर्झाला ब्लॅकलिस्ट करणार, मात्र महापौरांना असा कायदेशीर अधिकार आहे का, स्वतःच्या कामगिरीवरून टीकेला सामोरे जाणाऱ्या महापौरांना जगभरातून दूषणे मिळत आहेत. ज्या अभिनेत्रीने महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत विनामूल्य व्हिडिओ तयार करून दिला, तिचाच जाहीर अपमान केला जात आहे,’ अशी टीका पेडणेकर यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.