

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : समुद्रातील गाळ काढण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने आठ कोटी रुपये खर्चून खरेदी केलेली दोन कटर सक्शन ड्रेजर यंत्रे वापराविना पडून असल्याचे समोर आले आहे. पालघर जिल्ह्यातील सातपाटी येथे उभ्या असलेल्या ‘सीएसडी स्वामी’ या ड्रेजरच्या केबिनसह छत, बाहेरील पत्रे आणि अन्य भागांना गंज चढला आहे. प्रत्येकी चार कोटी रुपये किमतीची ही यंत्रे २०१३ मध्ये खरेदी करण्यात आली होती, मात्र खरेदीनंतर त्यांच्या वापराचे नियोजन प्रभावीपणे झाले नसल्याचे वारंवारच्या निविदा प्रक्रियेतून स्पष्ट होत आहे.
महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही यंत्रे स्वतः वापरण्याऐवजी भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाच्या नियमानुसार भाडेकरू मिळविण्यात अडचणी येत असल्याने पुन्हा निविदा काढण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले, मात्र गाळ काढण्याच्या कामासाठी खरेदी केलेली यंत्रे स्वतः वापरण्याऐवजी भाड्याने देण्याची वेळ का आली, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
तीन वर्षांत वारंवार निविदा
दोन्ही ड्रेजर भाडेतत्त्वावर देण्यासाठी मंडळाने २०२३ मध्ये निविदा काढली होती. त्यानंतर २०२४ मध्ये ‘सीएसडी स्वामी’साठी स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. २०२६ मध्ये पुन्हा दोन्ही यंत्रांसाठी निविदा काढण्यात आली. मात्र, या प्रयत्नांनंतरही भाडेकरू मिळविण्यात अडचणी कायम आहेत. त्यामुळे यंत्रांच्या खरेदीवेळी त्यांच्या वापरासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले होते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
देखभाल आणि वापराचा हिशेब अस्पष्ट
२०१३ मध्ये खरेदी केल्यापासून या यंत्रांनी किती तास काम केले, किती गाळ काढला आणि देखभाल-दुरुस्तीवर किती खर्च झाला, याबाबत तपशील सार्वजनिकरीत्या स्पष्ट झालेला नाही. ‘सीएसडी स्वामी’ची सध्याची कार्यक्षमता आणि दुसरे यंत्र ‘सीएसडी समर्थ’ सध्या कुठे आहे, याबाबतही माहिती स्पष्ट नाही. सातपाटी येथील छायाचित्रांत यंत्राचे काही भाग उघड्यावर, तर काही भाग ताडपत्रीने झाकलेले दिसतात. त्यामुळे या महागड्या यंत्रांच्या देखभालीबाबत आणि प्रत्यक्ष वापराबाबत प्रश्न निर्माण होत आहेत.
जबाबदारी निश्चित होणार का?
आठ कोटी रुपये खर्चून खरेदी केलेल्या यंत्रांचा अपेक्षित वापर झाला नसेल आणि देखभालीअभावी त्यांची अवस्था खराब झाली असेल, तर त्याची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे. खरेदीपासून वापरापर्यंतच्या नियोजनात नेमक्या कोणत्या त्रुटी राहिल्या, याची चौकशी होणार का तसेच सरकारी निधीच्या संभाव्य अपव्ययाला जबाबदार असलेल्या अधिकारी आणि निर्णयप्रक्रियेत सहभागी व्यक्तींवर कारवाई होणार का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
मुंबई : सक्शन ड्रेजर यंत्राच्या केबिनसह छत, बाहेरील पत्रे आणि अन्य भागांना गंज चढला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.