चेंबूरमध्ये बसमधून ११ लाखांची मिठाई जप्त

चेंबूरमध्ये बसमधून ११ लाखांची मिठाई जप्त
Published on: 

चेंबूरमध्ये बसमधून ११ लाखांची मिठाई जप्त
‘एफडीए’च्या कारवाईत ११ लाखांचा साठा जप्त

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि भेसळमुक्त अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान चेंबूरमध्ये लक्झरी बसमधून अस्वच्छ परिस्थितीत वाहतूक केला जाणारा चार हजार दोन किलो मिठाई आणि स्वीट हलव्याचा साठा जप्त करण्यात आला. या साठ्याची किंमत ११ लाख ११ हजार १७४ रुपये आहे.

सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवरील टिळकनगर पोलिस ठाण्याजवळ सोमवारी (ता. २) तानिया ट्रॅव्हल्सच्या बसची तपासणी करण्यात आली. या बसमधून नियंत्रित तापमानाशिवाय आणि अस्वच्छ परिस्थितीत अन्नपदार्थांची वाहतूक होत असल्याचे आढळले. त्यामुळे अन्नपदार्थांच्या सुरक्षिततेबाबत संशय निर्माण झाल्याने प्रशासनाने संपूर्ण साठा जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या साठ्यात नंदी इंडियन स्वीट हलवा, श्री गोकुळ ट्रेडिशनल स्वीट्स, गोपाल स्वीट बर्फी, श्री बन्सीधर स्वीट हलवा यांसह विविध प्रकारच्या मिठाईचा समावेश आहे. या अन्नपदार्थांचे सहा नमुने प्रयोगशाळेतील तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ नुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.

पाच आस्थापनांचे परवाने निलंबित; तीन गुन्हे
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर भेसळयुक्त, निकृष्ट आणि असुरक्षित अन्नपदार्थांची विक्री रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबविली. १ ते ३ नोव्हेंबरदरम्यान झालेल्या या कारवाईत सुमारे ४५ लाख रुपये किमतीचा अन्नसाठा जप्त करण्यात आला. पाच आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, तीन गुन्हे दाखल, दोघांना अटक आणि दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत. दोन आस्थापना सील करण्यात आल्या आहेत. प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधात कोकण आणि नाशिक विभागात विशेष कारवाई करण्यात आली. कोकणात ४६ हजार ४९० रुपये, तर नाशिकमध्ये ११ लाख आठ हजार ९० रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. नाशिकमध्ये दोघांना अटक करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.