मार्चअखेर सर्व कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा

मार्चअखेर सर्व कृषिपंपांना 
दिवसा वीजपुरवठा
Published on: 

मार्चअखेर सर्व कृषिपंपांना
दिवसा वीजपुरवठा

महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांची ग्वाही

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : राज्यातील शेतकऱ्यांना कृषिपंपासाठी दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०च्या माध्यमातून सध्या ८० टक्के कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा होत आहे. मार्चअखेर सर्व कृषिपंपांना सौरऊर्जेद्वारे दिवसा वीजपुरवठा करण्यात येईल, अशी ग्वाही महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी मंगळवारी दिली.
नवी दिल्ली येथे भारत रिन्यूबल एनर्जी समिट अँड एक्सपो २०२६ या केंद्र सरकारच्या नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेतील चर्चासत्रात लोकेश चंद्र बोलत होते. ‘डिस्ट्रीब्युटेड एनर्जी फॉर एनर्जी सिक्युरिटी, सेल्फ रिलायन्स अँड विकसित भारत २०४७’ या चर्चासत्रात त्यांनी महाराष्ट्राने विकेंद्रीत स्वरूपात सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प उभे करून कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी केल्या जाणाऱ्या कामगिरीची माहिती दिली.

महाराष्ट्रात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही पीएम कुसुम या केंद्राच्या योजनेच्या आधारे सुरू करण्यात आली असून, या योजनेत १६ हजार मेगावॉट क्षमतेचे सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प विकेंद्रीत स्वरूपात उभारण्यात येत आहेत. आतापर्यंत सुमारे सात हजार मेगावॉटचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. त्यातून उपलब्ध होणारी वीज आणि अन्य तांत्रिक उपायांच्या आधारे आता ८० टक्के कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा सुरू आहे.