

वायू गुणवत्ता यंत्रांची त्रयस्थ तपासणी होणार!
मुंबई, ता. ४ : मुंबईतील बांधकामांच्या ठिकाणी बसविण्यात आलेले हवा गुणवत्ता मोजणारे सेन्सर अचूक आहे की नाही, याची आता त्रयस्थ यंत्रणेमार्फत तपासणी केली जाणार आहे. मुंबईतील अशा एकूण नऊ हजार सेन्सर आधारित एअर क्वालिटी मॉनिटरची पुढील तीन वर्षे तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी महाबळ एन्व्हायरो इंजिनियर्स प्रा. लि. या कंपनीला ११ कोटी २८ लाख ५ हजार ५३१ रुपयांचे कंत्राट देण्याच्या प्रस्तावाला बुधवारी झालेल्या मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
कंत्राटाचा कालावधी कार्यादेशापासून तीन वर्षांचा असून, पावसाळा वगळून ७५० दिवसांच्या कालावधीत तपासणीचे काम केले जाणार आहे. दरवर्षी तीन हजार याप्रमाणे तीन वर्षांत एकूण नऊ हजार सेन्सरची तपासणी केली जाणार आहे. या तपासणीमुळे बांधकामांच्या ठिकाणी प्रदूषण नियंत्रणासाठी उभारलेल्या यंत्रणेची विश्वासार्हता तपासण्यास मदत होणार आहे. तपासणीमध्ये सेन्सरची तांत्रिक मानकांशी सुसंगतता, कॅलिब्रेशन, डेटाची अचूकता, रिअल टाइम डेटा प्रसारण, केंद्रीय डॅशबोर्डशी जोडणी तसेच उपकरणांची कार्यक्षमता आणि विश्वासार्हता तपासली जाणार आहे. त्यामुळे बांधकामांच्या ठिकाणी प्रदूषणाची नोंद करणारी यंत्रणा केवळ नावापुरती कार्यरत आहे की प्रत्यक्षात योग्य माहिती देत आहे, याची पडताळणी होणार आहे.