एसी लोकलमध्ये अनधिकृत प्रवासी

एसी लोकलमध्ये अनधिकृत प्रवासी
Published on: 

एसी लोकलमध्ये अनधिकृत प्रवासी
८२ टक्क्यांनी वाढ झाल्याचे उघड

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : विनातिकीट आणि अनियमित प्रवास करणाऱ्यांविरोधात पश्चिम रेल्वेने राबविलेल्या विशेष तिकीट तपासणी मोहिमेतून एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत १३८ कोटी पाच लाख रुपयांचा दंड वसूल केला. या कालावधीत विनातिकीट, अनियमित प्रवास आणि विनानोंदणी सामानाची एकूण १७ लाख ९३ हजार प्रकरणे आढळली. विशेष म्हणजे, एसी लोकलमधील अनधिकृत प्रवासाच्या प्रकरणांत गेल्या वर्षीच्या तुलनेत ८२ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
पश्चिम रेल्वेच्या वाणिज्य विभागाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली मुंबई उपनगरी लोकल, मेल-एक्स्प्रेस, पॅसेंजर आणि विशेष गाड्यांमध्ये तपासणी मोहीम राबविली. रेल्वेचा महसूल सुरक्षित ठेवणे आणि अधिकृत तिकीट घेऊनच प्रवास करण्यास प्रवाशांना प्रवृत्त करणे, हा या मोहिमेचा उद्देश होता. केवळ ऑक्टोबर महिन्यात विनातिकीट आणि अनियमित प्रवासाची दोन लाख ४४ हजारांहून अधिक प्रकरणे आढळली. त्यातून २१ कोटी ५३ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सात महिन्यांतील एकूण दंडाच्या तुलनेत ऑक्टोबरमधील वसुलीही लक्षणीय ठरली आहे. मुंबई उपनगरी रेल्वे मार्गावर एप्रिल ते ऑक्टोबरदरम्यान विनातिकीट आणि अनियमित प्रवासाची सहा लाख २८ हजार प्रकरणे आढळली. या कारवाईतून सुमारे ३६ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
...
एसी लोकलमध्ये कारवाई
एसी लोकलमध्ये सामान्य तिकीट किंवा पास घेऊन प्रवास करणाऱ्यांविरोधातही पश्चिम रेल्वेने विशेष तपासणी मोहीम राबविली. एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत एसी लोकलमधील अनधिकृत प्रवासाची एक लाख १३ हजार प्रकरणे आढळली. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत त्यात ८२ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.