अवैध औषध विक्रेत्यांवर एफडीएचा बडगा

अवैध औषध विक्रेत्यांवर एफडीएचा बडगा
Published on: 

अवैध औषध विक्रेत्यांवर एफडीएचा बडगा
सात महिन्यांत ५४४ परवाने रद्द; चौघांना अटक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : रुग्णांना सुरक्षित रक्त आणि दर्जेदार औषधे उपलब्ध व्हावीत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभर तपासणी आणि कारवाईचा वेग वाढविला आहे. १ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर या सात महिन्यांच्या कालावधीत एफडीएने सात हजार ९५० तपासण्या केल्या. या कारवाईत ५५५ परवाने रद्द, तर दोन हजार ७४ परवाने निलंबित करण्यात आले. दरम्यान, अवैध औषध विक्रीप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून, ३४.५१ लाख रुपयांचा औषध आणि सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त करण्यात आला आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ही माहिती दिली.

सात महिन्यांत औषधनिर्मिती केंद्रे आणि इतर आस्थापनांच्या एक हजार ४०२, तर औषध विक्री प्रतिष्ठानांच्या सहा हजार ५४८ तपासण्या करण्यात आल्या. या तपासण्यांदरम्यान दोन हजार ८८८ नोटिसा बजावण्यात आल्या. तसेच एकूण दोन हजार ६२९ परवान्यांवर कारवाई करण्यात आली. औषध विक्री प्रतिष्ठानांच्या तपासणीत चार हजार ५२६ किरकोळ औषध विक्रेते, ९४९ घाऊक विक्रेते, एक हजार ५ पॉइझन परवानाधारक आणि ६८ एनडीपीएस परवानाधारकांचा समावेश होता. यामध्ये तीन हजार ८४८ नियमित तपासण्या, एक हजार ५२५ विशेष मोहिमा आणि तक्रारींच्या आधारे एक हजार १७५ तपासण्या करण्यात आल्या. केवळ ऑक्टोबर महिन्यात औषध विक्री प्रतिष्ठानांच्या एक हजार १२१ नियमित तपासण्या, २८५ विशेष मोहिमा आणि २८८ तक्रारींच्या आधारे तपासण्या करण्यात आल्या.
....
बनावट औषधांचा साठा जप्त
ऑक्टोबर महिन्यात एफडीएने राज्यभरात ११ छापे टाकले. या कारवाईत सुमारे ३४.५१ लाख रुपयांची औषधे आणि सौंदर्यप्रसाधने जप्त करण्यात आली. अमली पदार्थांच्या अवैध विक्रीप्रकरणी एनडीपीएस कायद्यांतर्गत दोन गुन्हे दाखल करून चार जणांना अटक करण्यात आली. मुंबईतील कुलाबा परिसरातील आयएनएचएस अश्विनी रुग्णालयात एम्पिरिम गोळ्या आणि कार्डियुरेक्स इंजेक्शन या बनावट औषधांचा साठा आढळला. या प्रकरणी एक लाख रुपयांहून अधिक किमतीचा औषधसाठा जप्त करण्यात आला. नागपूरमध्ये विनापरवाना जागेत साठवलेली २२ लाख रुपयांहून अधिक किमतीची औषधे जप्त करण्यात आली. तर पुण्यात विनापरवाना तयार केलेल्या सौंदर्यप्रसाधनांच्या साबणांचा सुमारे ४.०५ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.