

राणीबागेतील सिंहांसाठी माकडांची जुळवाजुळव!
वनतारातून, दक्षिण आफ्रिकेतून आयात करण्याचा महापालिकेचा प्रयत्न
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता.५ : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय अर्थात राणीबागेत चार आशियाई सिंह आणण्याचा मार्ग मोकळा झाला असला, तरी त्यांच्या बदल्यात द्यायच्या ''टफ्टेड कॅपुचिन'' माकडांची उपलब्धता हा नवा पेच निर्माण झाला आहे. मुंबई महापालिकेच्या राणीबागेत या जातीची माकडे नसल्याने तीन जोड्या बाहेरून मिळवाव्या लागणार आहेत. त्यासाठी वनताराकडून माकडे मिळवण्याचा प्रयत्न सुरू असून, तेथे उपलब्ध न झाल्यास दक्षिण आफ्रिकेतून आयात करण्याचा पर्याय महापालिकेकडून तपासला जात आहे. या खरेदीसाठी सीएसआर निधी मिळवण्याचाही प्रयत्न आहे.
विशेष म्हणजे, पाच वर्षांपूर्वी सिंहांच्या बदल्यात झेब्रा देण्याचा प्रस्ताव होता; मात्र, महापालिकेकडे झेब्रा उपलब्ध नसल्याने तो प्रस्ताव रखडला होता. आता झेब्र्यांऐवजी टफ्टेड कॅपुचिन माकडांची उपलब्धता हा अडथळा ठरला आहे. तीन जोड्या मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रक्रिया राबवली जाणार असून, त्यासाठी एजन्सी नियुक्त केली जाणार आहे. ही माकडे मुंबईत न ठेवता थेट गुजरातमधील साकरबाग प्राणिसंग्रहालयाला दिली जाणार आहेत. महापौर रितू तावडे यांना वनतारामध्ये ही माकडे उपलब्ध असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे, तेथून माकडे मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हा प्रयत्न यशस्वी न झाल्यास दक्षिण आफ्रिकेतून आयात करण्याचा पर्याय आहे. याचा खर्च अद्याप निश्चित झालेला नाही.
...............
१२ वर्षांपासून सिंहांची प्रतीक्षा
राणीबागेत गेल्या १२ वर्षांपासून सिंह नाहीत. २०१४ मध्ये जिमी या शेवटच्या सिंहाचा मृत्यू झाल्यानंतर येथे पुन्हा सिंह आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गुजरात आणि इंदूर येथून सिंह आणण्याचे प्रस्तावही मांडण्यात आले होते; मात्र, प्राण्यांची अदलाबदल आणि प्रशासकीय कारणांमुळे हे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. आता महापौर रितू तावडे यांनी गुजरात दौऱ्यात याचा पाठपुरावा केला. नवीन वर्षाच्या आत चार आशियाई सिंह मुंबईत दाखल होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सिंहासाठी राणीबागेत पाच हजार चौरस मीटर जागेवर आवश्यक निवासव्यवस्था पूर्ण करण्यात आली आहे.
...............
सिंह आणण्याची घाई कशासाठी?
मुंबईसह ग्रामीण भागात दुष्काळी परिस्थिती असताना सिंह आणण्याची एवढी घाई कशासाठी, असा सवाल विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देण्याऐवजी सिंह आणण्यावर भर दिला जात असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
...............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.