नव्या महापालिका सभागृहाचा मार्ग मोकळा

नव्या महापालिका सभागृहाचा मार्ग मोकळा
Published on: 

नव्या महापालिका सभागृहाचा मार्ग मोकळा

आयुक्तांची प्रस्तावावर स्वाक्षरी, सोमवारी स्थायी समितीची मंजुरी अपेक्षित

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : मुंबई महापालिकेच्या नव्या सभागृहाच्या बांधकामातील तांत्रिक अडथळा अखेर दूर झाला आहे. आझाद मैदान परिसरातील जुन्या क्रीडा भवनाच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या ३२० नगरसेवकांच्या आसनक्षमतेच्या भव्य सभागृहाच्या सुधारित प्रस्तावावर महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी गुरुवारी स्वाक्षरी केली. आता सोमवारी (ता.९) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही महिन्यांपासून रखडलेल्या नव्या सभागृहाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती सभागृहनेते गणेश खणकर यांनी दिली.

महापालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदान परिसरातील जुन्या क्रीडा भवनाच्या जागेवर टाऊन हॉल आणि जिमखाना विकसित करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने एप्रिल २०२६मध्ये आणला होता. सध्याचे महापालिका सभागृह नगरसेवकांच्या संख्येच्या तुलनेत अपुरे पडत असल्याने या प्रकल्पातच नवीन सभागृहाचा समावेश करण्याची मागणी सभागृह नेत्यांनी केली होती. त्यानुसार स्थायी समितीने मूळ प्रस्ताव परत पाठवून सुधारित आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले होते.

प्रशासनाने ३२० नगरसेवकांची आसनक्षमता असलेले सभागृह, महापौर, उपमहापौर आणि विरोधी पक्षनेत्यांसाठी स्वतंत्र दालने, पत्रकार कक्ष यांसह विविध सुविधांचा समावेश असलेला सुधारित आराखडा तयार केला. मंजुरीसाठी सादर केलेल्या प्रस्तावात महापालिका अधिनियमातील संबंधित कलमाचा चुकीचा संदर्भ देण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे प्रशासनाने स्वतःच हा प्रस्ताव मागे घेतला होता. परिणामी, सभागृहाच्या बांधकामाचा विषय पुन्हा रखडला होता. दरम्यान, प्रस्तावातील तांत्रिक आणि प्रशासकीय त्रुटी दूर करून आवश्यक बदल करण्यात आले आहेत. सुधारित प्रस्ताव अंतिम करण्यात आला असून, गुरुवारी आयुक्त अश्विनी भिडे यांनी त्यावर स्वाक्षरी केली. आता सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे. समितीची मंजुरी मिळाल्यानंतर पुढील कार्यवाहीला सुरुवात होऊ शकणार आहे.
-----
काेट
काही तांत्रिक बाबींमुळे मागील वेळी हा प्रस्ताव रखडला होता. त्यामुळे आवश्यक त्या दुरुस्त्या करून प्रस्ताव नव्याने अंतिम करण्यात आला आहे. आयुक्तांनी आज प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे. सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत त्याला मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा आहे.
-गणेश खणकर, सभागृह नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.