

दुष्काळग्रस्त तालुक्यांत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : राज्यातील दुष्काळग्रस्त भागांतील गरजू रुग्णांना वेळेत उपचार आणि आर्थिक मदत मिळावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष तालुका स्तरावर सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. खरीप हंगाम २०२६ मध्ये ट्रिगर-१अंतर्गत दुष्काळ जाहीर झालेल्या सर्व तालुक्यांत हे कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत.
सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी (ता. ६) याबाबतचा शासन निर्णय जारी केला. संबंधित तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयात हा कक्ष सुरू होईल. जिल्हाधिकारी स्वतंत्र वैद्यकीय अधिकाऱ्याची कक्षप्रमुख म्हणून नियुक्ती करतील. त्यांच्या मदतीला लिपिक आणि टंकलेखक असतील. रुग्णांना प्रथम आयुष्मान भारत, महात्मा फुले जनआरोग्य योजना, कामगार विभागाच्या योजना तसेच धर्मादाय रुग्णालयांमधून उपचार मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. या योजनांसाठी अपात्र असलेल्या रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून देण्यासाठी कक्ष मार्गदर्शन करेल. यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर आरोग्य समन्वय समित्या स्थापन केल्या जाणार आहेत. दोन्ही समित्यांच्या महिन्यातून किमान दोन बैठका बंधनकारक असतील. आरोग्य शिबिरे, फिरती वैद्यकीय पथके आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवांचे नियोजनही केले जाणार आहे. कोणताही गरजू रुग्ण आर्थिक अडचणीमुळे उपचारांपासून वंचित राहू नये, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.