एका दिवसांत ८०.३८ लाखांचा दंड वसूल

एका दिवसांत ८०.३८ लाखांचा दंड वसूल
Published on: 

एका दिवसात ८०.३८ लाखांचा दंड वसूल
‘ऑपरेशन दीप’अंतर्गत तिकीट तपासणी मोहीम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : दिवाळी आणि छठपूजेच्या काळात रेल्वेतील वाढती गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने विनातिकीट प्रवाशांविरोधात कारवाई तीव्र केली आहे. या मोहिमेत मुंबई सेंट्रल विभागाने शुक्रवारी (ता. ६) एका दिवसात तब्बल ८०.३८ लाख रुपयांचा दंड वसूल केला. विभागाच्या तिकीट तपासणी मोहिमेतील ही आतापर्यंतची सर्वाधिक दंडवसुली ठरली आहे. यापूर्वी ३० एप्रिल २०२६ला एका दिवसात ६८.५४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्याचा विक्रम नोंदविण्यात आला होता. नव्या विक्रमामुळे मागील वसुलीपेक्षा ११.८४ लाख रुपयांची वाढ झाली आहे.

सणासुदीच्या काळात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने ३१ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत १५ दिवसांची विशेष तिकीट तपासणी मोहीम हाती घेतली आहे. ‘ऑपरेशन दीप’ असे या मोहिमेचे नाव असून, स्थानकांसह रेल्वेगाड्यांमध्येही तपासणी पथकांकडून कारवाई केली जात आहे. विनातिकीट प्रवास, चुकीच्या श्रेणीतून प्रवास आणि रेल्वेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मुंबई सेंट्रल विभागाने १ ते ६ नोव्हेंबरदरम्यान तिकीट तपासणीतून एकूण ३.२८ कोटी रुपयांचा दंड वसूल केला. गेल्या वर्षी दिवाळी आणि छठपूजेच्या काळात १९ ऑक्टोबर २०२५ला एका दिवसात ५५.४० लाख रुपयांची दंडवसुली झाली होती. यंदा ६ नोव्हेंबरला झालेली वसुली त्या तुलनेत ४५.१ टक्क्यांनी अधिक आहे.

चार टप्प्यांत मोहीम
‘दीप’ या नावातून मोहिमेची चार टप्प्यांतील कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये ‘डी’ म्हणजे विनातिकीट प्रवाशांचा शोध, ‘ई’ म्हणजे तिकिटांची तपासणी, दुसरे ‘ई’ म्हणजे रेल्वे नियमांची अंमलबजावणी आणि ‘पी’ म्हणजे नियम मोडणाऱ्यांकडून दंडवसुली, अशा चार टप्प्यांचा समावेश आहे. विनातिकीट प्रवासाला आळा घालणे, रेल्वेचा महसूल सुरक्षित ठेवणे आणि उपलब्ध तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांचा प्रभावी वापर करणे, हा या मोहिमेचा उद्देश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.