धावत्या लोकलमध्ये प्रवाशांचा राडा

धावत्या लोकलमध्ये प्रवाशांचा राडा
Published on: 

धावत्या लोकलमध्ये प्रवाशांचा राडा
प्रथम श्रेणीच्या डब्यात हाणामारी; व्हिडिओची पडताळणी सुरू

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरी रेल्वेतील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. चर्चगेटहून विरारच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकलच्या प्रथम श्रेणीच्या डब्यात प्रवाशांमध्ये हाणामारी झाल्याचा आठ सेकंदांचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. ही घटना मुंबई सेंट्रल आणि ग्रँट रोड स्थानकांदरम्यान घडल्याचे समजते; मात्र या व्हिडिओतील घटनेची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.

व्हायरल व्हिडिओमध्ये प्रथम श्रेणीच्या डब्यात काही प्रवासी एकमेकांना मारहाण करताना दिसत आहेत. या वेळी डब्यातील अन्य प्रवासीही उपस्थित असल्याचे दिसते. मात्र, हा वाद नेमका कोणत्या कारणावरून सुरू झाला, हाणामारीत सहभागी असलेले प्रवासी कोण आहेत आणि ही घटना नेमकी कधी घडली, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. या व्हिडिओसंदर्भात रेल्वे प्रशासनाला विचारणा केली असता, व्हिडिओची सत्यता तपासण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाला (आरपीएफ) सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे लोहमार्ग पोलिसांत या घटनेसंदर्भात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे व्हिडिओतील घटनेचे नेमके ठिकाण, वेळ आणि हाणामारीमागील कारण स्पष्ट होण्यासाठी पडताळणी महत्त्वाची ठरणार आहे.

यापूर्वीही रक्तरंजित पडसाद
पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर प्रवाशांमधील वादातून यापूर्वीही गंभीर घटना घडल्या आहेत. २४ जानेवारी २०२६ला मालाड स्थानकात लोकलमधून उतरण्यावरून झालेल्या वादातून एन. एम. महाविद्यालयातील प्राध्यापक आलोक कुमार सिंह यांची चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर २३ जून २०२६ला चर्चगेट-नालासोपारा जलद लोकलमध्ये दरवाजा बंद करण्यावरून झालेल्या वादातून मयांक लोहार या २२ वर्षीय तरुणाची हत्या झाली होती. अंधेरी आणि बोरिवली स्थानकांदरम्यान प्रथम श्रेणीच्या डब्यात ही घटना घडली होती. या दोन्ही घटनांमुळे लोकलमधील प्रवाशांमधील वाद किती गंभीर वळण घेऊ शकतात, हे स्पष्ट झाले आहे.

सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
धावत्या लोकलमध्ये प्रवाशांमध्ये वाद होणे आणि त्याचे हाणामारीत रूपांतर होणे, ही चिंतेची बाब आहे. अशा घटनांमध्ये संबंधित प्रवाशांसह डब्यातील अन्य प्रवाशांच्याही सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे व्हायरल व्हिडिओची सत्यता तपासून घटनेमागील नेमके कारण स्पष्ट करणे आणि उपनगरीय रेल्वेतील सुरक्षा व्यवस्था अधिक प्रभावी करण्याची काळजी गरज असल्याची प्रतिक्रिया प्रवासी संघटनेकडून घेण्यात आलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.