

अंधेरीत बेकायदा हॉटेल्सवर हातोडा
टायगर गोळीबार प्रकरणानंतर पालिकेची कारवाई
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर मुंबई महापालिका ॲक्शन मोडमध्ये आले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या के पूर्व विभागाने अंधेरी पूर्व परिसरातील अनधिकृत हॉटेल, गेस्ट हाउस आणि डॉरमेट्रीविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेत आतापर्यंत १५ हून अधिक हॉटेल, गेस्ट हाउस आणि डॉरमेट्रींवर हातोडा चालविण्यात आला.
टायगर श्रॉफ याच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपींनी अंधेरी पूर्व परिसरातील हॉटेल आणि डॉरमेट्रीमध्ये मुक्काम केला होता. याच ठिकाणी वास्तव्यास असताना आरोपींनी चित्रपट कलाकारांच्या घरांची रेकी केल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील अनधिकृत निवास व्यवस्थांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईत विविध भागांत मोठ्या प्रमाणात अनधिकृत हॉटेल, गेस्ट हाउस आणि डॉरमेट्री सुरू आहेत. यापैकी अनेक ठिकाणी आवश्यक परवानग्या, सुरक्षा व्यवस्था आणि नियमांचे पालन केले जात नसल्याच्या तक्रारी आहेत, अशा ठिकाणांचा गैरवापर करून बेकायदा कारवायांना आश्रय मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा आस्थापनांची तपासणी आणि अनधिकृत बांधकामांवरील कारवाई महापालिकेने सुरू केली आहे. टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणानंतर पोलिसांनी शहरातील हॉटेल आणि लॉजमधील येणाऱ्याच्या नोंदी, ओळखपत्रे आणि संशयास्पद हालचालींची तपासणी केली जात आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर काही दिवस आम्ही कारवाई स्थगित केली आहे; मात्र दिवाळीनंतर पुन्हा एकदा जोमाने या कारवाईला सुरुवात होईल. दिवाळीनंतर अनधिकृत हॉटेल, गेस्ट हाउस आणि डॉरमेट्रीविरोधातील कारवाईला आणखी वेग देण्यात येणार आहे.
- वनिता कोकाटे, सहाय्यक आयुक्त
.........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.