

जीएमएलआर प्रकल्पाला दुहेरी गती
‘विहार’ बोगद्याचे खोदकाम सुरू; फेब्रुवारी २०२९ पर्यंत लक्ष्य
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील अंतर कमी करणाऱ्या गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याच्या कामाने आता वेग घेतला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या दुहेरी भूमिगत बोगद्यांच्या खोदकामाला एकाच वेळी सुरुवात झाली असून, ‘तुळशी’ आणि ‘विहार’ ही दोन अत्याधुनिक यंत्रे कामाला लागली आहेत. पहिल्या यंत्राने २७० मीटरचा टप्पा पार केला असून, दुसऱ्या यंत्रानेही खोदकाम सुरू केले आहे. त्यामुळे गोरेगाव-मुलुंड प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.
दोन्ही बोगद्यांमधून प्रत्येकी तीन अशा एकूण सहा मार्गिकांद्वारे वाहतूक सुरू होणार आहे. यामुळे गोरेगाव ते मुलुंडदरम्यानचा प्रवास अधिक जलद होण्यास मदत होणार आहे. गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता हा मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा १२.२० किलोमीटर लांबीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यातील (ब) कामांतर्गत गोरेगाव पूर्व येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंड पश्चिमेकडील अमरनगरदरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून प्रत्येकी तीन मार्गिकांचे दोन भूमिगत बोगदे बांधण्यात येत आहेत. या बोगद्यांची लांबी प्रत्येकी ६.६७५ किलोमीटर आहे. त्यापैकी ५.३४ किलोमीटरचे खोदकाम अत्याधुनिक बोगदा खनन यंत्रांच्या माध्यमातून केले जाणार आहे. पहिल्या बोगद्याच्या खोदकामासाठी ‘तुळशी’ हे यंत्र १७ ऑगस्ट २०२६ रोजी कार्यान्वित करण्यात आले. या यंत्राद्वारे दररोज सरासरी सहा मीटर खोदकाम केले जात असून, टप्प्याटप्प्याने ही क्षमता प्रतिदिन १० मीटरपर्यंत वाढविण्याचे नियोजन आहे. या यंत्राने आतापर्यंत २७० मीटरचे अंतर पार केले आहे.
दरम्यान, दुसऱ्या बोगद्याचे खोदकाम करणाऱ्या ‘विहार’ यंत्राच्या स्थळ स्वीकृत चाचण्या नुकत्याच पूर्ण झाल्या. यंत्रातील यांत्रिक, विद्युत, हायड्रॉलिक आणि नियंत्रण प्रणालींची तपासणी केल्यानंतर ते खोदकामासाठी सज्ज करण्यात आले. शनिवारी (ता. ७) प्रत्यक्ष खोदकामाला सुरुवात झाली. ‘विहार’ यंत्राचा कटर हेड १४.४९ मीटर व्यासाचा असून, संपूर्ण यंत्राची लांबी ८३ मीटर आहे. अर्थ प्रेशर बॅलन्स तंत्रज्ञानामुळे खोदकाम करताना जमिनीचा दाब नियंत्रित ठेवणे शक्य होणार आहे.
---
७४३ बांधकामे बाधित
दुसरीकडे मुलुंड येथील बोगद्याच्या अंतिम टप्प्यातील कामासाठी आवश्यक असलेल्या रिट्रिव्हल शाफ्ट आणि रॅम्पच्या बांधकामात ७४३ बांधकामे बाधित होत आहेत. त्यापैकी ६१२ बांधकामे आतापर्यंत निष्कासित करण्यात आली आहेत. उर्वरित १३१ बांधकामे डिसेंबर २०२६ अखेरपर्यंत किंवा जानेवारी २०२७ च्या सुरुवातीला हटविण्याचे नियोजन आहे. बाधित कुटुंबांचे कांजूरमार्ग येथील इमारतींत पुनर्वसन करण्यात येणार आहे.
--------------------------------------
काेट
दोन्ही बोगद्यांचे खोदकाम एकाच वेळी सुरू झाल्याने प्रकल्पाच्या नियोजित वेळापत्रकानुसार काम पूर्ण करण्यास मदत होईल. कामात विलंब होऊ नये यासाठी मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि तांत्रिक बाबींचा नियमित आढावा घेण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. हा संपूर्ण प्रकल्प फेब्रुवारी २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.
- अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प), महापालिका
............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.