

मुंबई-पुणे स्लीपर बससाठी पाच हजार रुपये!
दिवाळीच्या गर्दीची खासगी बसचालकांकडून लूट
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गावी जाणाऱ्या प्रवाशांना खासगी बसच्या अवाजवी भाडेवाढीचा फटका बसत आहे. मुंबई-पुणे स्लीपर बससाठी तब्बल पाच हजार रुपये, मुंबई-औरंगाबादसाठी ९,९९९ रुपये, तर मुंबई-नागपूरसाठी आठ हजार रुपये भाडे आकारले जात असल्याने प्रवाशांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे, नियमित दरांच्या तुलनेत दोन ते तीनपट भाडेवाढ झाल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर खासगी बसचालकांच्या जादा भाडेवसुलीला आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने १ ते २० नोव्हेंबरदरम्यान विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे.
दिवाळी सणांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतून गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते, रेल्वे आणि एसटीची आरक्षित तिकिटे उपलब्ध होत नसल्याने अनेक प्रवासी खासगी बसचा पर्याय निवडतात. याच गर्दीचा फायदा घेत काही खासगी बसचालकांकडून अवाजवी भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी दरवर्षी समोर येतात. यंदाही मुंबई-पुणे, मुंबई-औरंगाबाद, मुंबई-नागपूर आणि मुंबई-सातारा या मार्गांवर प्रवाशांना मोठी आर्थिक झळ बसत आहे. खासगी बसचे वाढते भाडे आणि मर्यादित पर्याय यामुळे प्रवाशांची कोंडी होत असून, परिवहन विभागाच्या तपासणी मोहिमेतून अवाजवी भाडेवसुलीला कितपत आळा बसतो, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
दीडपट भाडे आकारण्याची मर्यादा
राज्य सरकारच्या २७ एप्रिल २०१८ च्या निर्णयानुसार खासगी कंत्राटी प्रवासी बसचालकांना एसटी महामंडळाच्या संबंधित बससेवेच्या तिकीटदराच्या दीडपटीपेक्षा अधिक भाडे आकारता येत नाही, प्रत्येक मार्गासाठी निश्चित केलेले कमाल भाडे आणि प्रतिआसन दराचा तक्ता बस सुटण्याच्या ठिकाणी प्रवाशांना सहज दिसेल अशा ठिकाणी लावणे बंधनकारक आहे. तसेच तक्रारींसाठी हेल्पलाइन क्रमांकही प्रदर्शित करणे आवश्यक आहे.
‘एसटी’ला पसंती द्या!
एसटीने प्रवास केल्यास अमृत ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के, तर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना ५० टक्के तिकीटदरात सवलत मिळते. त्यामुळे ‘कमी दरात सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांनी एसटीला पसंती द्यावी,’ असे आवाहन मुंबई एसटी विभागाचे विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.