रुग्णांना फराळ, भेटवस्तूंचे वाटप

रुग्णांना फराळ, भेटवस्तूंचे वाटप
Published on: 

रुग्णांना फराळ, भेटवस्तूंचे वाटप
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : दिवाळीचा आनंद समाजातील गरजू आणि आजाराशी झुंज देणाऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने स्वामी - सोशल वर्कर्स असोसिएशन फॉर मेडिकल, एज्युकेशन अँड एन्व्हायर्नमेंट संस्थेतर्फे ‘दिवाळी धमाका’ हा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत २५० कर्करुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना दिवाळी फराळासह विविध भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.
परळ येथील शिरोडकर वातानुकूलित सभागृहात गुरुवारी (ता. ५) सायंकाळी हा कार्यक्रम झाला. या वेळी फेस्कॉमचे मुंबई अध्यक्ष सुरेश पोटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रत्येक रुग्णाला सुमारे ९०० रुपये किमतीच्या भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये दिवाळी फराळ, उटणे, साबण, तेल, चादर आणि साडी अशा वस्तूंचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी विरंगुळा केंद्रातील ज्येष्ठ नागरिकांच्या वाद्यवृंदाने हिंदी गीतांचा कार्यक्रम सादर केला. संस्थेचे कार्याध्यक्ष मोहन कटारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी गेल्या १५ दिवसांपासून या उपक्रमासाठी मेहनत घेतली.
‘दिवाळी केवळ आपल्या घरातच नव्हे, तर दुसऱ्यांच्याही आयुष्यात उजळली पाहिजे. आर्थिक मदत शक्य नसली, तरी रुग्णांना भेटण्यासाठी वेळ द्या आणि ज्येष्ठांशी प्रेमाने संवाद साधा. हीच खरी माणुसकीची सेवा आहे,’ असे सुरेश पोटे यांनी सांगितले.