

बीकेसीमध्ये ‘महाभारत इंटरनॅशनल ट्रेड एक्स्पो’
सकाळवृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योजकांना (एमएसएमई) आपली उत्पादने मोठ्या बाजारपेठेत सादर करण्याची संधी मिळणार आहे. आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीतर्फे ४ ते १४ डिसेंबरदरम्यान मुंबईत ‘महाभारत इंटरनॅशनल ट्रेड एक्स्पो २०२६’ आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या पात्र उद्योजकांना केंद्र सरकारकडून स्टॉलसाठी १०० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार आहे.
वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) एमएमआरडीए मैदानावर हे प्रदर्शन होईल. राज्य सरकारच्या सहकार्याने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. यंदा आयएमसीतर्फे मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर येथेही अशा प्रकारची प्रदर्शने मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात आली होती. या प्रदर्शनात वस्त्रोद्योग, इलेक्ट्रॉनिक्स, आरोग्य, एफएमसीजी, वाहननिर्मिती, भेटवस्तू, हातमाग, चामड्याच्या वस्तू, पादत्राणे, फर्निचर, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, माहिती तंत्रज्ञान, गृहसजावट, औषधनिर्मिती आणि स्वच्छ ऊर्जा अशा विविध क्षेत्रांतील उत्पादनांना स्थान मिळणार आहे. एमएसएमई गटातील ६० व्यावसायिकांना या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी केंद्र सरकारची मान्यता मिळाली आहे. पात्र उद्योजकांना स्टॉलसाठी ८० ते १०० टक्क्यांपर्यंत अर्थसहाय्य मिळेल. तसेच प्रवास खर्चासाठी २५ हजार रुपयांपर्यंत मदत आणि सहभागासाठी विशेष अनुदानही दिले जाणार आहे. उद्यम नोंदणी असलेल्या लघुउद्योजकांनी या प्रदर्शनासाठी नोंदणी करावी, असे आवाहन आयएमसीतर्फे करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.