

चेन पुलिंगमुळे वेळापत्रक कोलमडले!
दिवाळीच्या गर्दीत मेल-एक्स्प्रेस, लोकलमध्ये सहा घटना
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढलेली असतानाच मध्य रेल्वेवर चेन पुलिंगच्या सहा घटना घडल्या. पाच मेल-एक्स्प्रेस आणि एका लोकलमध्ये चेन पुलिंग झाल्याने रेल्वेचे वेळापत्रक विस्कळित झाले. या घटनांमुळे संबंधित गाड्या थांबवाव्या लागल्या. त्याचा परिणाम मागून येणाऱ्या लोकल आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांवरही झाला. अनेक लोकल विलंबाने धावल्या, तर ठाणे-कल्याणदरम्यानची एक लोकल रद्द करावी लागली. दिवाळीच्या गर्दीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या प्रकारांचा फटका बसला.
रेल्वे क्रमांक ११०५५ गोदान एक्स्प्रेसमध्ये चेन पुलिंग झाल्याने ही गाडी दुपारी १२.०७ ते १२.१६ या वेळेत कल्याण स्थानकात थांबवण्यात आली. त्यानंतर रेल्वे क्रमांक ११०६१ पवन एक्स्प्रेसमध्ये चेन पुलिंग झाल्याने ही गाडी दुपारी १२.४३ ते १२.५३ या वेळेत कल्याण स्थानकातील फलाट क्रमांक चारवर थांबली. या दोन्ही घटनांमुळे डाऊन मार्गावरील वाहतुकीसह अंबरनाथ आणि टिटवाळा दिशेने जाणाऱ्या लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. रेल्वे क्रमांक ११३०१ उद्यान एक्स्प्रेसमध्येही चेन पुलिंग करण्यात आले. या गाडीच्या इंजिनपासून सातव्या आणि अकराव्या डब्यात एकाच वेळी चेन पुलिंग झाल्याने दुपारी १.१५ ते १.२२ या वेळेत ती कल्याण स्थानकात थांबली. अशा प्रकारे कल्याण स्थानकात तीन मेल-एक्स्प्रेस गाड्यांमध्ये चेन पुलिंगच्या घटना घडल्या. रेल्वे क्रमांक २०१०३ लोकमान्य टिळक टर्मिनस-आझमगड सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये चेन पुलिंग झाल्याने ही गाडी सकाळी ५.२७ ते ५.४१ या वेळेत लोकमान्य टिळक टर्मिनस ते विद्याविहारदरम्यान थांबवण्यात आली. या घटनेमुळे अंबरनाथ, टिटवाळा आणि कसारा दिशेने जाणाऱ्या लोकलच्या वाहतुकीवर परिणाम झाला. रेल्वे क्रमांक १५१८२ लोकमान्य टिळक टर्मिनस-मऊ एक्स्प्रेसमध्येही चेन पुलिंग झाल्याने ही गाडी दुपारी १२.३४ ते १२.४७ या वेळेत कल्याण ते शहाडदरम्यान थांबली. याशिवाय टिटवाळा-सीएसएमटी लोकलमध्ये चेन पुलिंग झाल्याने ही गाडी सकाळी ९.१८ ते ९.२२ या वेळेत विद्याविहार ते कुर्लादरम्यान थांबवण्यात आली.
...
अनेक गाड्यांना फटका
चेन पुलिंगमुळे एखादी गाडी थांबल्यास तिच्या मागून येणाऱ्या लोकल आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम होतो. चेन पुलिंगचा वापर केवळ वैद्यकीय आणीबाणीसारख्या अत्यावश्यक परिस्थितीतच करावा. विनाकारण चेन पुलिंग करणे हा रेल्वे कायद्यानुसार दंडनीय अपराध आहे. विनाकारण साखळी ओढून इतरांच्या प्रवासात अडथळा निर्माण करू नये, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.