

मध्य रेल्वेच्या कीर्ती रंगस्वामींची सुवर्ण चौकार कामगिरी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : रांची येथे झालेल्या ७८व्या वरिष्ठ राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत मध्य रेल्वेच्या महिला कर्मचाऱ्याने दमदार कामगिरी करत चार सुवर्णपदकांवर नाव कोरले. पुणे विभागातील विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या कीर्ती रंगस्वामी यांनी चार सुवर्णपदकांसह ‘सर्वोत्कृष्ट महिला सायकलपटू २०२६’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार पटकावला. त्यांच्या या कामगिरीमुळे मध्य रेल्वेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
रांची येथे झालेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील सायकलपटूंनी विविध ट्रॅक प्रकारांत सहभाग घेतला. वेग, सहनशक्ती आणि तांत्रिक कौशल्याची कसोटी असलेल्या या स्पर्धेत रंगस्वामी यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. रंगस्वामी यांनी एक किलोमीटर स्प्रिंट, एक किलोमीटर सांघिक स्प्रिंट, एक किलोमीटर टाइम ट्रायल आणि केइरिन या चारही प्रकारांत सुवर्णपदकांची कमाई केली. विशेष म्हणजे, या स्पर्धेत त्यांनी दोन राष्ट्रीय विक्रमांचीही नोंद केली. वैयक्तिक एक किलोमीटर टाइम ट्रायलमध्ये एक मिनिट १३.८०७ सेकंद, तर सांघिक स्प्रिंटमध्ये एक मिनिट ९.९६६ सेकंद अशी वेळ नोंदवत त्यांनी नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. चार सुवर्णपदके आणि दोन राष्ट्रीय विक्रमांच्या जोरावर रंगस्वामी यांची स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट महिला सायकलपटू म्हणून निवड करण्यात आली. रेल्वेतील नियमित कामकाजाची जबाबदारी सांभाळतानाच राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश विशेष उल्लेखनीय आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल मध्य रेल्वेने अभिनंदन केले असून, त्यांच्या यशातून रेल्वे कर्मचाऱ्यांमधील क्रीडाप्रतिभा आणि जिद्दीचे दर्शन घडले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.