

अग्निशमन केंद्रांवर सौरऊर्जा प्रकल्प
११ ठिकाणी ७०० किलोवॉट वीजनिर्मितीचे नियोजन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या १० केंद्रांसह भायखळा येथील महापालिका मुद्रणालयाच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. या ११ ठिकाणी एकूण ७०० किलोवॉट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे नियोजन असून, त्यासाठी सुमारे चार कोटी ६८ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे महापालिकेच्या वीज खर्चात बचत होण्यासोबतच कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत होणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समिती आणि स्थापत्य समिती (शहर) यांच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.
प्रस्तावानुसार कुलाबा अग्निशमन केंद्रात ५५ किलोवॉट, दादर येथे ६०, नरिमन पॉइंट येथे ५०, वांद्रे येथे ६५, बोरिवली येथे ७५, वांद्रे-कुर्ला संकुल येथे ३५, गोरेगाव येथे ३०, दिंडोशी येथे ३५, मुलुंड येथे ६५ आणि मानखुर्द येथे ६० किलोवॉट क्षमतेचे प्रकल्प उभारले जातील. तर भायखळा मुद्रणालयात बॅटरी ऊर्जा साठवण प्रणालीसह १०० आणि त्याशिवाय ७० किलोवॉट क्षमतेचा प्रकल्प प्रस्तावित आहे. या कामासाठी महापालिकेने ई-निविदा मागवल्या होत्या. त्यात पाच कंपन्यांनी सहभाग घेतला. त्यापैकी मे. सेव्हन ग्रीन्स सोलर सिस्टीम्स प्रा. लि. या कंपनीने कार्यालयीन अंदाजापेक्षा ५३.१६ टक्के कमी दराने निविदा सादर केली. कंपनीचा प्रस्ताव सर्वात कमी दराचा ठरला असून, त्यासाठी स्पष्टीकरण मागविण्यात आले होते. ते समाधानकारक असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
..
दंड आकारण्याची तरतूद
सौरऊर्जा प्रकल्पाचे काम कार्यादेश मिळाल्यापासून पावसाळा वगळून सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सौरऊर्जा प्रकल्पांच्या देखभाल व दोष दायित्वासाठीही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. वार्षिक वीजनिर्मिती निर्धारित क्षमतेपेक्षा कमी झाल्यास संबंधित कंत्राटदारावर दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे.
.......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.