

कसारा मार्गावर दोन दिवस विशेष ब्लॉक
मध्यरात्री खर्डी-कसारादरम्यान लोकल सेवा बंद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : आसनगाव-कसारा तिसऱ्या मार्गिकेचे काम आणि कसारा स्थानकातील अप यार्ड मार्गिकेच्या विस्तारासाठी मध्य रेल्वेने १३ आणि १४ नोव्हेंबरच्या मध्यरात्री विशेष ब्लॉक जाहीर केला आहे. रात्री ११.१० ते मध्यरात्री १.४० या वेळेत खर्डी-कसारादरम्यान अप मुख्य मार्ग आणि तिसऱ्या मार्गिकेवर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे दोन्ही रात्री ब्लॉकच्या कालावधीत खर्डी-कसारा यादरम्यान लोकल सेवा बंद राहणार असून, काही लोकल फेऱ्या आसनगाव आणि खर्डीपर्यंतच चालविण्यात येणार आहेत.
१३ आणि १४ नोव्हेंबरला सीएसएमटीहून कसाऱ्यासाठी सुटणारी शेवटची लोकल रात्री ८.४४ वाजता रवाना होईल. त्यानंतर रात्री ९.३२ वाजल्यापासून कसाऱ्याकडे जाणाऱ्या लोकल आसनगावपर्यंतच चालविण्यात येतील. रात्री ११.०५ वाजताची सीएसएमटी-कसारा लोकल खर्डी येथेच थांबविण्यात येईल. ब्लॉक पूर्ण झाल्यानंतर ती कसाऱ्याच्या दिशेने रवाना होईल. कसारा येथून सीएसएमटीसाठी सुटणारी शेवटची लोकल रात्री १० वाजता रवाना होईल. ब्लॉकनंतर १४ आणि १५ नोव्हेंबरला पहाटे ३.५१ वाजता कसारा येथून सीएसएमटीसाठी पहिली लोकल सुटेल.
मेल-एक्स्प्रेस गाड्यांनाही विलंब
ब्लॉकमुळे डाऊन दिशेने धावणाऱ्या १० मेल-एक्स्प्रेस गाड्या कसारा स्थानकात २० ते २५ मिनिटे थांबविण्यात येणार आहेत. १३ आणि १४ नोव्हेंबरच्या मध्यरात्री एलटीटी-सुबेदारगंज अमृत भारत एक्स्प्रेस आणि एलटीटी-भुवनेश्वर एक्स्प्रेसचे नियमन केले जाईल. तसेच १३ आणि १४ नोव्हेंबर या दोन्ही मध्यरात्री सीएसएमटी-हावडा, एलटीटी-बनारस, सीएसएमटी-गोरखपूर विशेष, एलटीटी-पाटलीपुत्र, सीएसएमटी-अमृतसर, सीएसएमटी-बनारस महानगरी आणि एलटीटी-गोरखपूर कुशीनगर एक्स्प्रेसला विलंब होईल. १४ आणि १५ नोव्हेंबरच्या मध्यरात्री एलटीटी-हटिया एक्स्प्रेसचेही नियमन करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.