

भारत-ओमान नौदलाचा संयुक्त सागरी सराव
‘नसीम अल बहर’ सरावाची १५वी आवृत्ती; आयएनएस सुरतसह ‘अल मुअज्जर’ युद्धनौकेचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : भारत आणि ओमान यांच्यातील सागरी सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने भारतीय नौदल आणि ओमानच्या रॉयल नेव्हीने ‘नसीम अल बहर’ (सी ब्रीझ) या द्विपक्षीय सागरी सरावाची १५वी आवृत्ती आयोजित केली. या सरावातून दोन्ही देशांच्या नौदलांमधील समन्वय वाढविणे, व्यावसायिक सहकार्य अधिक मजबूत करणे आणि परस्परांच्या कार्यपद्धतींची माहिती करून घेण्यावर भर देण्यात आला.
सरावाच्या पहिल्या टप्प्यात बंदर परिसरात दोन्ही नौदलांच्या तज्ज्ञ पथकांमध्ये विविध विषयांवर चर्चा आणि ज्ञानाची देवाणघेवाण झाली. यात स्फोटक पदार्थ निकामी करणे, सागरी सुरुंग शोधणे व निष्क्रिय करणे आणि जलविज्ञान सर्वेक्षण या विषयांचा समावेश होता. या चर्चांमुळे दोन्ही देशांच्या नौदलांना तांत्रिक ज्ञान आणि प्रत्यक्ष कामकाजातील अनुभवाची देवाणघेवाण करता आली. सरावाच्या दुसऱ्या टप्प्यात समुद्रात विविध संयुक्त मोहिमा राबविण्यात आल्या. भारतीय नौदलाच्या ‘आयएनएस सुरत’ आणि ओमानच्या रॉयल नेव्हीच्या ‘अल मुअज्जर’ या युद्धनौकांनी त्यात सहभाग घेतला. या वेळी जहाजावर चढून तपासणी करणे, झडती घेणे आणि संशयास्पद वस्तू किंवा सामग्री जप्त करण्यासंदर्भातील प्रात्यक्षिके घेण्यात आली. तसेच दोन्ही युद्धनौकांवरील कर्मचाऱ्यांनी एकमेकांच्या जहाजांवर जाऊन कामकाजाचा अनुभव घेतला. या सरावामुळे संयुक्त मोहिमांमध्ये आवश्यक असलेला समन्वय आणि कार्यक्षमता वाढविण्यास मदत झाली.
सागरी भागीदारीला बळ
‘नसीम अल बहर’ हा सराव भारत आणि ओमान यांच्यातील दृढ सागरी भागीदारीचे प्रतीक आहे. सागरी सहकार्य वाढविणे आणि प्रादेशिक सागरी सुरक्षा अधिक सक्षम करणे, या उद्देशाने दोन्ही देशांची नौदले एकत्रितपणे काम करत आहेत. केंद्र सरकारच्या ‘महासागर’ या संकल्पनेला अनुसरून प्रादेशिक सागरी भागीदार देशांशी सहकार्य वाढविण्याच्या भारताच्या प्रयत्नांनाही या सरावामुळे बळ मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.