छटपूजेसाठी वाहतुकीवर निर्बंध

छटपूजेसाठी वाहतुकीवर निर्बंध
Published on: 

छठपूजेसाठी वाहतुकीवर निर्बंध
जुहू बीचकडे जाणारे दोन प्रमुख मार्ग बंद; पार्किंगलाही मनाई
सकाळ वृत्तसेवा
मुंबई : छठपूजेनिमित्त जुहू समुद्रकिनाऱ्यावर भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने मुंबई वाहतूक पोलिसांनी जुहू परिसरातील वाहतुकीत तात्पुरते बदल जाहीर केले आहेत. रविवारी (ता. १५) दुपारी दोन वाजल्यापासून सोमवार (ता. १६) सकाळी ११ वाजेपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत. या काळात काही रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असून, काही मार्गांवर एकेरी वाहतूक आणि पार्किंगबंदी लागू करण्यात आली आहे.
सांताक्रूझ वाहतूक विभागाच्या हद्दीत हे बदल करण्यात आले आहेत. सांताक्रूझ पोलिस ठाणे जंक्शन ते जुहू बीच तसेच ट्युलिप स्टार हॉटेल जंक्शन ते जुहू बीच हे दोन्ही मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहतील, मात्र पोलिस आणि आपत्कालीन सेवांच्या वाहनांना या निर्बंधांतून सूट देण्यात आली आहे.

या रस्त्यांवर पार्किंगला बंदी
जुहू तारा रोडच्या दोन्ही बाजूंना तसेच ए. बी. नायर रोड, व्ही. एम. रोड, जुहू चर्च रोड आणि बिर्ला लेन येथे निर्बंधांच्या कालावधीत वाहनतळास मनाई करण्यात आली आहे.

एकेरी वाहतुकीची व्यवस्था
ए. बी. नायर रोडवरून चर्च रोडमार्गे बलराज सहानी मार्गाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी एकेरी वाहतूक लागू राहील. हॉटेल महाराजा भोगसमोरील यू-टर्न बंद ठेवण्यात येणार आहे. ट्युलिप स्टार हॉटेलमार्गे जुहू कोळीवाड्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांना जुहू कोळीवाडा जंक्शनवरील यू-टर्नचा वापर करावा लागणार आहे.

पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
लिंक रोडवरून येणाऱ्या वाहनांनी सांताक्रूझ पोलिस ठाणे जंक्शनवर उजवीकडे वळून स्टँडर्ड चार्टर्ड बँक जंक्शनवरून डावीकडे वळावे आणि एस. व्ही. रोडने पुढे जावे. ट्युलिप स्टार हॉटेलच्या दिशेने येणारी वाहने व्ही. एम. रोडने वळविण्यात येतील. तसेच एन. एस. रोड क्रमांक १३ येथे जाण्यासाठी जुहू चर्च रोड आणि अल्फ्रेडो क्रियाडो रोड या पर्यायी मार्गांचा वापर करता येणार आहे.
छठपूजेच्या काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन मुंबई वाहतूक पोलिसांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.