

मुंबई, ता. १२ : दिवाळीच्या पाच दिवसांत मुंबईत आगीच्या तब्बल ४९९ दुर्घटना घडल्या असून, त्यापैकी ३३३ म्हणजेच सुमारे ६७ टक्के आगी या फटाक्यांमुळे लागल्याचे अग्निशमन दलाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. या दुर्घटनांमध्ये मालाड-मालवणी येथे एका मुलासह दोघांचा मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले आहेत. न्यायालयाचे निर्बंध असतानाही सार्वजनिक ठिकाणे, गल्ल्या आणि झोपडपट्टी परिसरात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आल्याने आगीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले.
गेल्या ६ ते १० नोव्हेंबरदरम्यान अग्निशमन दलाकडे आगीच्या एकूण ४९९ घटनांचे कॉल नोंदवण्यात आले. यापैकी ३३३ घटनांमध्ये फटाके हे आगीचे प्रमुख कारण ठरले. विभागनिहाय आकडेवारी पाहता, अंधेरी ते मालाडचा समावेश असलेल्या परिमंडळ चारमध्ये सर्वाधिक १७५ आगींची नोंद झाली. त्यापैकी सुमारे १२१ आगी फटाक्यांमुळे लागल्या. त्याखालोखाल परिमंडळ तीनमध्ये ८७, परिमंडळ दोनमध्ये ८१, परिमंडळ पाचमध्ये ६६ आणि परिमंडळ सहामध्ये ६० आगींच्या घटना घडल्या. कुलाबा ते भायखळा परिसराचा समावेश असलेल्या परिमंडळ एकमध्ये सर्वांत कमी ३० आगींची नोंद झाली.
आगींच्या घटनांचे हॉटस्पॉट
दिवाळीच्या काळात रविवार आणि सोमवार हे दोन दिवस आगींच्या घटनांच्या दृष्टीने सर्वाधिक धोकादायक ठरले. ६ नोव्हेंबरला ३३, तर ७ नोव्हेंबरला ५६ आगींच्या घटना घडल्या होत्या, मात्र ८ नोव्हेंबरला रविवारी आगींची संख्या थेट १४२ वर पोहोचली. त्यापैकी तब्बल १३७ आगी फटाक्यांमुळे लागल्या. सोमवारी ९ नोव्हेंबरला आगींच्या घटनांनी पाच दिवसांतील उच्चांक गाठला. या दिवशी १६६ आगींची नोंद झाली असून, त्यापैकी १४४ आगी फटाक्यांमुळे लागल्या होत्या. मंगळवारी १० नोव्हेंबरला आगींच्या घटनांमध्ये काहीशी घट झाली. या दिवशी १०२ आगींची नोंद झाली. त्यापैकी २४ घटना फटाक्यांमुळे घडल्या. एकूण आकडेवारी पाहता, दिवाळीतील फटाक्यांच्या आतषबाजीचा थेट परिणाम अग्निशमन दलाच्या कामकाजावर आणि मुंबईकरांच्या सुरक्षिततेवर झाल्याचे स्पष्ट होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.