नव्या सभागृहाला मंजुरी

नव्या सभागृहाला मंजुरी
Published on: 

नव्या सभागृहाला मंजुरी
सहा मजली इमारत उभारणार; ४५ कोटी रुपये खर्च

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : महापालिकेच्या ऐतिहासिक मुख्यालयातील अपुऱ्या पडणाऱ्या सभागृहाला पर्याय म्हणून उभारण्यात येणाऱ्या नव्या सभागृहाच्या प्रस्तावावर अखेर स्थायी समितीने मोहर उमटवली. आझाद मैदानाशेजारी सहा मजली इमारत उभारण्यात येणार असून, त्यामध्ये तब्बल ३३९ नगरसेवकांच्या बैठकीची व्यवस्था असेल. सुमारे ४४ कोटी ८७ लाख २८ हजार ८८७ कोटी रुपये खर्चाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला स्थायी समितीने गुरुवारी सर्वानुमते मंजुरी दिली. येत्या दोन वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.
मुंबई महापालिकेचे सध्याचे ऐतिहासिक सभागृह १८९३ मध्ये उभारण्यात आले होते. त्या वेळी नगरसेवकांची संख्या कमी असल्याने हे सभागृह पुरेसे होते, मात्र कालांतराने नगरसेवकांची संख्या वाढल्याने सभागृहातील जागा अपुरी पडू लागली. सध्या २२७ नगरसेवक असून, पत्रकार, सचिव विभागातील अधिकारी आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमुळे बैठक व्यवस्थेवर मर्यादा येत आहेत. त्यामुळे नवीन सभागृह उभारण्याची मागणी सातत्याने होत होती. अखेर या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी मिळाल्याने नव्या सभागृहाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे, मात्र प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान सदस्यांनी प्रशासनाला विविध मुद्द्यांवर धारेवर धरले. मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी प्रस्ताव इंग्रजीत सादर केल्याबद्दल आक्षेप घेतला. मुंबई महापालिकेला मराठी भाषेचे वावडे आहे का, असा सवाल करत महत्त्वाचे प्रस्ताव मराठीत सादर करण्याची मागणी त्यांनी केली. एमआयएमचे जमीर कुरेशी यांनी निविदा प्रक्रिया, जागेचे क्षेत्रफळ आणि प्रकल्पाच्या खर्चाबाबत प्रश्न उपस्थित केले. सुरुवातीला चार हजार ७१९ चौरस मीटर असलेले प्रस्तावित क्षेत्रफळ २६ टक्क्यांनी कसे वाढले, असा सवाल त्यांनी केला. भविष्यात प्रकल्पाचा खर्च वाढणार का, याचे स्पष्टीकरणही प्रशासनाने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी प्रकल्प पूर्ण होण्याची मुदत, सुरक्षा रक्षकांची संख्या आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत माहिती मागितली. जुन्या आणि नव्या इमारतीदरम्यान ये-जा करण्यासाठी विशेष जोडमार्ग उभारण्यात येणार आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
सभागृह नेते गणेश खणकर यांनी हा प्रकल्प पर्यावरणपूरक पद्धतीने उभारण्यात येणार असल्याचे सांगितले. पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी पावसाच्या पाण्याचा वापर करण्यात येणार असून, इमारतीवर सौरऊर्जा पॅनेलही बसविण्यात येतील. त्यामुळे हा प्रकल्प मुंबईसाठी आदर्श ठरू शकतो, असे ते म्हणाले. दरम्यान, नव्या इमारतीतील पार्किंगच्या व्यवस्थेवर सर्वपक्षीय नगरसेवकांनी चिंता व्यक्त केली. ७० ते ८० वाहनांसाठीच पार्किंगची सुविधा प्रस्तावित असल्याने नगरसेवकांची संख्या लक्षात घेता वाहनतळ अपुरे पडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
...
इमारतीत काय असणार?
नव्या इमारतीचे एकूण बांधकाम क्षेत्र ५,९९५ चौरस मीटर असून, उंची ३१.९० मीटर असेल. तळघरात पार्किंग, तळमजल्यावर गॅलरी हॉल आणि प्रवेशद्वाराची लॉबी असेल. पहिल्या पोडियमवर पार्किंग, तर दुसऱ्या पोडियमवर बॅडमिंटन कोर्ट आणि पार्किंगची व्यवस्था असेल. तिसऱ्या मजल्यावर व्यायामशाळा आणि इनडोअर गेम्स, चौथ्या मजल्यावर स्वागतकक्ष, प्रतीक्षागृह, परिषद कक्ष, कार्यालय, भोजनकक्ष आणि कॅफेटेरिया असेल. पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर सभागृह व ऑडिटोरियम उभारण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.