एचबीटी ट्रॉमा रुग्णालय समस्यांच्या विळख्यात

एचबीटी ट्रॉमा रुग्णालय समस्यांच्या विळख्यात
Published on: 

मुंबई, ता. १३ : पश्चिम द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातांतील जखमींना तातडीने उपचार मिळावेत, या उद्देशाने जोगेश्वरी पूर्व येथे उभारण्यात आलेले हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (एचबीटी) ट्राॅमा रुग्णालय सध्या विविध समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. रुग्णालयातील महत्त्वाची तपासणी यंत्रे बंद असून, डॉक्टरांच्या अपुऱ्या संख्येमुळे गंभीर रुग्णांना प्राथमिक उपचारांनंतर अन्य रुग्णालयांत पाठवावे लागत आहे. त्यामुळे अपघातग्रस्त रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला अपघातानंतरचा पहिला तास वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष राजेश शर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे आणि स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना पत्र पाठवून रुग्णालयातील दुरवस्थेकडे लक्ष वेधले आहे. हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने चोवीस तास सुरू राहणारे अपघात उपचार केंद्र बनवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. प्रशासनाने मागण्यांवर ठोस कार्यवाही न केल्यास मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

मुंबई महापालिकेचे वार्षिक अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक ८० हजार ९५२ कोटींचे असून, त्यातील ७ हजार ४५६ कोटी रुपये आरोग्य क्षेत्रासाठी तरतूद करण्यात आलेली आहे. अशा परिस्थितीत जोगेश्वरीतील या महत्त्वाच्या रुग्णालयाच्या सक्षम व्यवस्थापनासाठी दरवर्षी सुमारे ७० कोटींची आवश्यकता असल्याचे शर्मा यांनी पत्रात म्हटले आहे.

खाटांची संख्या वाढवावी
रुग्णालयातील समस्या दूर करण्यासाठी त्यांनी प्रशासनासमोर कालमर्यादेसह विविध मागण्या मांडल्या आहेत. येत्या सात दिवसांत सीटी स्कॅन आणि क्ष-किरण तपासणी सेवा पूर्ववत कराव्यात, ३० दिवसांत आवश्यक तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करावी आणि अतिदक्षता विभागातील खाटांची संख्या १० वरून ५० पर्यंत वाढवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच पुढील ९० दिवसांत रुग्णालयाचे दुसऱ्या स्तरावरील अपघात उपचार केंद्रात रूपांतर करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.