लोकलमधील सुरक्षा वाऱ्यावर

लोकलमधील सुरक्षा वाऱ्यावर
Published on: 

लोकलमधील सुरक्षा वाऱ्यावर
आरपीएफ, लोहमार्ग पोलिसांची अडीच हजारांहून अधिक पदे रिक्त
नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरी रेल्वेतून दररोज सुमारे ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. यामध्ये महिला प्रवाशांची संख्याही मोठी आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी महिला डबे, सीसीटीव्ही कॅमेरे, आरपीएफची गस्त, हेल्पलाइन आणि पॅनिक बटण अशा विविध उपाययोजना केल्याचा दावा रेल्वे प्रशासनाकडून केला जातो, मात्र प्रत्यक्ष प्रवासात महिलांची सुरक्षितता किती आहे, याचे वास्तव नायगाव स्थानकातील घटनेने समोर आणले आहे. आरपीएफ आणि जीआरपीची मिळून अडीच हजार पदे रिक्‍त असल्‍याने सुरक्षा यंत्रणेवर ताण येत आहे.
उपनगरी लोकल रेल्वेच्या महिला डब्यांमध्ये पुरेसे सुरक्षा कर्मचारी, विशेषतः रात्रीच्या वेळी नियमित गस्त आणि तक्रारींवर तातडीने प्रतिसाद देणारी यंत्रणा आवश्यक आहे, मात्र मोठ्या प्रमाणावर असलेल्‍या रिक्त पदांमुळे अशा घटना सातत्‍याने समोर येत आहेत.

हेल्पलाइनच्या तातडीच्या प्रतिसादाचा प्रश्न
महिला प्रवाशांच्या मदतीसाठी रेल्वे हेल्पलाइन आणि रेल मदत प्रणाली उपलब्ध आहे, मात्र आपत्कालीन परिस्थितीत तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुलभ असणे आणि मदत वेळेत पोहोचणे गरजेचे आहे.संकटाच्या वेळी काही मिनिटेही महत्त्वाची ठरतात. त्यामुळे तक्रार मिळाल्यानंतर तातडीने मदत पोहोचविण्याची व्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज आहे.

सीसीटीव्हीचा योग्य वापर होतो का?
रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. गुन्हा घडल्यानंतर आरोपीचा माग काढण्यासाठी या चित्रणाचा उपयोग होतो, मात्र संशयास्पद हालचाली वेळीच ओळखून संभाव्य गुन्हा रोखण्यासाठी या यंत्रणेचा कितपत वापर होतो, हा प्रश्न आहे. दुसरीकडे महिला डब्यांमध्ये पॅनिक बटण बसविण्याची योजना प्रस्तावित आहे. हे बटण दाबल्यानंतर मोटरमन, गार्ड आणि आरपीएफ नियंत्रण कक्षाला सूचना मिळण्याची व्यवस्था अपेक्षित आहे, मात्र ही सुविधा सर्व महिला डब्यांमध्ये प्रत्यक्षात उपलब्ध आहे का, याबाबत स्पष्टता आवश्यक आहे.

आरपीएफची १,८१६ पदे रिक्त
मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातील आरपीएफमध्ये १,८१६ पदे रिक्त आहेत. मुंबई लोहमार्ग पोलिसांमध्येही ७४३ पदे रिक्त आहेत. त्यामुळे आरपीएफ आणि जीआरपी मिळून २,५५९ पदे रिक्त आहेत. ही पदे तातडीने भरण्याचे आव्हान रेल्वे आणि राज्य सरकारसमोर आहे.

मुंबईत लाखो महिला लोकलने प्रवास करतात, त्या तुलनेत आरपीएफ आणि जीआरपीचे मनुष्यबळ अपुरे आहे. पोलिसांची संख्या तातडीने वाढविण्यासाठी राज्याच्या गृहमंत्र्यांनी लक्ष घालावे.
- लता अरगडे, अध्यक्षा, उपनगरी प्रवासी महासंघ

रात्रीच्या वेळी महिला डब्यांमध्ये पुरेशी गस्त नसते. कागदावरील उपाययोजनांऐवजी प्रत्यक्ष सुरक्षिततेची हमी मिळाली पाहिजे.
- वंदना सोनवणे, अध्यक्षा, महाराष्ट्र रेल्वे महिला प्रवासी संघटना

मुंबईतील सुरक्षा यंत्रणेची स्थिती
मुंबई लोहमार्ग पोलिस
- मंजूर पदे : ४,२४३
- कार्यरत कर्मचारी : ३,५००
- रिक्त पदे : ७४३

मध्य रेल्वे, मुंबई विभागातील आरपीएफ
- मंजूर पदे : ५,१४८
- कार्यरत कर्मचारी : ३,८५२
- रिक्त पदे : १,२९६

पश्चिम रेल्वे, मुंबई विभागातील आरपीएफ
- मंजूर पदे : १,८९४
- कार्यरत कर्मचारी : १,३७४
- रिक्त पदे : ५२०

मुंबईतील उपनगरी प्रवासीसंख्या
- मध्य रेल्वे : ४० लाख
- पश्चिम रेल्वे : ३५ लाख
- एकूण : ७५ लाख

एकूण रिक्त पदे
- आरपीएफ : १,८१६
- लोहमार्ग पोलिस : ७४३
- एकूण : २,५५९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.