

एसटी बँकेच्या विमा नूतनीकरणात गैरव्यवहार?
६२ हजार सभासदांसाठी ५.९६ कोटींचा हप्ता; संघटनाचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : एसटी बँकेच्या सभासद कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या अपघाती विमा पॉलिसीच्या नूतनीकरणात गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. विमा पॉलिसीसाठी अवाजवी प्रीमियम देण्यात आला असून, यामध्ये कमिशनचा व्यवहार झाल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने शनिवारी (ता. १४) केला. याप्रकरणी एसटी बँकेच्या प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.
महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सांगितले, ‘एसटी बँकेने २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सभासदांच्या अपघाती विमा पॉलिसीचे नूतनीकरण करताना झुनो जनरल इन्शुरन्स कंपनीला मुदतवाढ दिली आहे; मात्र यासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली नाही तसेच नियम आणि अटींचे पालन करण्यात आले नाही. ‘आरटीजीएस’द्वारे कंपनीला तब्बल पाच कोटी ९६ लाख ४९ हजार ७१० रुपये प्रीमियमपोटी देण्यात आले आहेत. ही रक्कम अवाजवी आहे.’ एसटी बँकेचे सुमारे ६२ हजार सभासद असून, विमा हप्त्यांपैकी ७५ टक्के रक्कम सभासदांच्या रुपया निधी खात्यातून, तर २५ टक्के रक्कम बँकेकडून भरली जाते. गेल्या वर्षी सुमारे १० सभासदांचा अपघाती मृत्यू झाला असून, त्यापोटी जवळपास एक कोटी रुपयांचे विमा दावे करण्यात आल्याचा दावा बरगे यांनी केला. असे असताना यंदा विम्यासाठी जवळपास सहा कोटी रुपये का खर्च करण्यात आले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पैशांचा अपव्यय!
विमा हप्ता निश्चित करताना तीन वर्षांतील अपघाती मृत्यूंची सरासरी विचारात घ्यावी तसेच सभासदांना मिळणारी विमा संरक्षणाची रक्कम वाढवून २५ लाख रुपये करावी, अशी मागणीही बरगे यांनी केली. सभासदांच्या पैशांचा अपव्यय झाल्याचा संशय व्यक्त करीत या व्यवहाराची चौकशी करण्यासाठी संबंधित विभागांना पत्र दिल्याचे बरगे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.