‘सीएसएमटी’ पुनर्विकासात ५६ झाडांवर कुऱ्हाड

‘सीएसएमटी’ पुनर्विकासात ५६ झाडांवर कुऱ्हाड
Published on: 

‘सीएसएमटी’ पुनर्विकासात ५६ झाडांवर कुऱ्हाड
महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची मंजुरी; १२८ झाडे बाधित


सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकाच्या प्रस्तावित पुनर्विकास प्रकल्पात परिसरातील तब्बल १२८ झाडे बाधित होणार आहेत. यापैकी ५६ झाडे तोडण्यात येणार असून, ७२ झाडांचे अन्यत्र पुनर्रोपण केले जाणार आहे. या वृक्षतोडीला आणि पुनर्रोपणाला मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने शुक्रवारी (ता. १३) मंजुरी दिली. तोडण्यात येणाऱ्या झाडांच्या बदल्यात १५ दिवसांत दोन हजार ४६३ नवीन झाडे लावण्याचे नियोजन केले आहे. मात्र, यापूर्वी विकासकामांसाठी तोडलेल्या झाडांच्या बदल्यात करण्यात आलेली वृक्षलागवड प्रत्यक्षात कुठे आहे, असा सवाल उपस्थित करीत विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रशासनाला धारेवर धरले.

सीएसएमटी पुनर्विकास प्रकल्पात यापूर्वी याच भूखंडावरील ६६ झाडे तोडण्यास, १८० झाडांचे पुनर्रोपण करण्यास आणि २५६ झाडे आहे त्याच ठिकाणी सुरक्षित ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्ष पाहणीत सुरक्षित ठेवण्याचे निश्चित केलेल्या २५६ झाडांपैकी १४ झाडे जागेवर आढळली नाहीत. महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधिकारी आणि रेल्वे भूमी विकास प्राधिकरणाच्या प्रतिनिधींनी संयुक्त पाहणी केली असता, संबंधित परिसरात एकूण २४२ झाडे आढळली. त्यापैकी १२८ झाडे पुनर्विकासामुळे बाधित होणार असल्याचे स्पष्ट झाले. तोडण्यात येणाऱ्या ५६ झाडांच्या बदल्यात दोन हजार ४६३ झाडांची लागवड करण्यात येणार आहे. आरपीएफ बॅरेक, ठाकुर्ली पूर्व येथील १४ हजार २०२ चौरस मीटर आणि दिघा येथील मोगलीचे डॅम परिसरातील ११ हजार ४३१ चौरस मीटर अशा एकूण २५ हजार ६३३ चौरस मीटर क्षेत्रावर पारंपरिक पद्धतीने ही लागवड केली जाणार आहे. नव्याने लावलेल्या झाडांचे सात वर्षे जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी संबंधित विकसकामार्फत पार पाडली जाणार आहे.


वृक्षलागवडीच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह
वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत किशोरी पेडणेकर यांनी जुन्या वृक्षलागवडीच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यापूर्वी वृक्षतोड आणि छाटणीनंतर लावण्यात आलेली झाडे प्रत्यक्षात कुठे आहेत, त्यांची सद्यःस्थिती काय आहे याचा हिशेब प्रशासनाने द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच सीएसएमटी स्थानकाची उभारणी १८८८ मध्ये झाली असून, १९५०च्या सुमारास त्याचा विस्तार करण्यात आला. मात्र, सादर प्रस्तावातील एकही झाड ५० वर्षांपेक्षा अधिक वयाचे नसल्याकडे नगरसेवक प्रमोद सावंत यांनी लक्ष वेधले. विरोधकांचे आक्षेप असतानाही सत्ताधारी पक्षाच्या संख्याबळावर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.