

क्रीडांगणाच्या देखभालीवरून वाद
मलबार हिलमधील एस. एम. जोशी मैदानाचा प्रश्न; प्रतिष्ठानची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : मलबार हिल येथील स्वातंत्र्यसेनानी एस. एम. जोशी क्रीडांगणाच्या देखरेखीवरून महापालिका प्रशासन आणि स्थानिक सामाजिक संस्थेमध्ये वाद निर्माण झाला आहे. गेल्या १५ वर्षांपासून क्रीडांगणाच्या देखभालीची जबाबदारी ११ महिन्यांच्या करारावर मिळावी, यासाठी पाठपुरावा करूनही महापालिकेने दखल घेतली नसल्याचा आरोप संजय शिर्के प्रतिष्ठानने केला आहे. याउलट उद्यान विभागाने अन्य एका व्यक्तीला मैदानाच्या वापरासाठी परवानगी दिल्याने येथील मुलांच्या खेळण्याच्या हक्कावर गदा येत असल्याची तक्रार संस्थेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मलबार हिल आणि परिसरातील झोपडपट्टीतील रहिवासी, मराठी कुटुंबे, कामगार वर्ग तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी हे एकमेव क्रीडांगण असल्याचा दावा प्रतिष्ठानने निवेदनात केला आहे. संस्थेच्या माध्यमातून गेल्या २९ वर्षांपासून या मैदानावर व्हॉलीबॉल, क्रिकेट, चित्रकला, आरोग्य आणि शैक्षणिक उपक्रम राबवले जात आहेत. तसेच महाराष्ट्र दिनानिमित्त दरवर्षी सुमारे ५० स्थानिक संघांच्या सहभागातून विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. महापालिकेच्या धोरणानुसार ११ महिन्यांच्या करारावर मैदानाची देखभाल करण्याची संधी मिळावी, यासाठी उद्यान अधीक्षक आणि डी विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र, प्रतिष्ठानच्या मागणीचा विचार न करता अन्य एका व्यक्तीला सकाळी दोन आणि संध्याकाळी दोन तास मैदान वापरण्याची परवानगी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित व्यक्तीने मैदानावर क्रिकेटची खेळपट्टी तयार केल्याने सुरक्षा रक्षकांमार्फत येथील स्थानिक मुलांना खेळण्यास मज्जाव केला जात असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
क्रीडाप्रेमींमध्ये नाराजी
विशेष म्हणजे या मैदानाच्या वापराबाबत यापूर्वी जनहित याचिका दाखल झाली होती. त्यानंतर महापालिकेने मैदान सर्वांसाठी खेळण्याकरिता खुले ठेवण्याचे आदेश दिले होते, असे असतानाही उद्यान विभागाने परस्पर निर्णय घेतल्याने स्थानिक क्रीडाप्रेमींमध्ये नाराजी आहे. याप्रकरणी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि डी विभागाच्या अधिकाऱ्यांनाही निवेदनाच्या प्रती पाठवण्यात आल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.