

अचानक लॉकडाऊनमुळे हाल झाले!
नसीरुद्दीन शाह यांची सरकारवर टीका; डॉक्टरांच्या कामाचे कौतुक
मुंबई, ता. १४ : कोरोना महामारीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतीही पूर्वतयारी करण्यासाठी पुरेसा वेळ न देता अचानक देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला, या निर्णयावर ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी नाराजी व्यक्त केली.
मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित ‘ट्रस्ट इन अ टाइम ऑफ क्रायसिस’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. मनीलाईफ फाउंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातील अनेक व्यक्ती उपस्थित होत्या.
कोरोनाकाळातील डॉक्टरांच्या कामाचे कौतुक करताना शाह म्हणाले, ‘‘माझ्या अभिनय कारकिर्दीत अनेक कठीण परिस्थितींना सामोरे जावे लागले; मात्र कोरोनाकाळात पीपीई किट घालून डॉक्टरांनी ज्या परिस्थितीत काम केले, त्याची कल्पनाही करता येणार नाही. त्या किटमध्ये किती उकाडा आणि त्रास सहन करावा लागत असेल, हे सांगणे कठीण आहे.’’ स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेची चिंता असतानाही डॉक्टरांनी रुग्णसेवा सुरू ठेवली. हिप्पोक्रेटिक शपथेचा सन्मान राखत त्यांनी कर्तव्य बजावले. महामारीत प्राण गमावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना अदृश्य शत्रूविरुद्धच्या लढाईतील शहीद मानतो, असेही शाह यांनी भावनिकपणे सांगितले.
....
संकटाच्या काळातील मदतीची आठवण
सुचेता दलाल आणि प्रा. रितू दिवाण यांनी संपादित केलेले हे पुस्तक मुंबईतील नागरिकांनी उभारलेल्या कोविड मदत नेटवर्कचा दस्तऐवज आहे. डॉक्टर आणि नागरिकांना जोडणाऱ्या एका छोट्या व्हॉट्सॲप ग्रुपमधून या उपक्रमाची सुरुवात झाली. पुढे त्याचा विस्तार झाला. या नेटवर्कच्या माध्यमातून ३०हून अधिक रुग्णालये आणि अनेक पोलिस ठाण्यांना पीपीई किट, वैद्यकीय साहित्य आणि इतर आवश्यक मदत पुरवण्यात आली. पुस्तकात डॉ. रंगनाथ झवार, डॉ. अविनाश सकनुरे यांच्यासह अनेक डॉक्टरांनी महामारीतील अनुभव मांडले आहेत. रुग्णालयांवरील वाढता ताण, वैद्यकीय साहित्याची कमतरता आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा शारीरिक व मानसिक संघर्ष यांचे चित्र यातून समोर येते. संकटाच्या काळात डॉक्टरांपासून सामान्य नागरिकांपर्यंत अनेकांनी केलेल्या मदतीची आठवण या पुस्तकातून जिवंत ठेवण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.