

रक्त असूनही रुग्णांची परवड!
औषधनिर्मितीसाठी प्लाझ्माचा वापर, प्लेटलेट्सचे अल्प आयुष्य; मागणी-पुरवठ्याच्या नियोजनाचे आव्हान
सकाळ वृत्तसेवा
मुंबई,ता. १५ : मुंबईतील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा उपलब्ध असला, तरी रुग्णांना आवश्यक असलेले विशिष्ट रक्तघटक वेळेत मिळतात का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पॅक्ड रेड सेल्स, प्लेटलेट्स आणि फ्रेश फ्रोजन प्लाझ्मा या घटकांची उपलब्धता ही एकूण रक्तसाठ्यापेक्षा वेगळी असते, मात्र काही वेळा रक्त घटकांचा औषधे तयार करण्यासाठीही होत असल्याने त्यातील काही प्लाझ्मा औषधनिर्मिती कंपन्यांना दिला जातो. परिणामी रुग्णांसाठी रक्तघटकांची उपलब्धता कमी पडण्याची शक्यता एका अधिकाऱ्याने व्यक्त केली. त्यामुळे रक्ताच्या पिशव्यांची संख्या नव्हे, तर घटकनिहाय साठा आणि प्रत्यक्ष मागणी यांचा आढावा घेणे आवश्यक असल्याचे वारंवार स्पष्ट होत आहे.
केईएम रुग्णालयातील रक्तघटक विभाजन यंत्रणेतील तांत्रिक अडचणींमुळे रक्तघटक निर्मितीवर परिणाम झाला होता. मार्चमध्ये सुमारे ५०० युनिट आरडीपी आणि एक हजार युनिट एफएफपी तयार झाले होते, मात्र एप्रिलमध्ये आरडीपीनिर्मिती १२ युनिटवर आली, तर मे महिन्यात आरडीपी, एसडीपी आणि एफएफपी यापैकी एकाही घटकाची निर्मिती झाली नाही. त्यामुळे मे महिन्यात केईएमला सरकारी रक्तपेढ्यांकडून ५४२, तर खासगी रक्तपेढ्यांकडून ५०० युनिट रक्तघटक किंवा पॅक्ड रेड सेल्स मिळवावे लागले, तर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कूपर रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना निलंबित झाल्याने दोन दिवस सेवा बंद ठेवावी लागली. या काळात रुग्णांना जोगेश्वरी येथील एचबीटी ट्रॉमा रुग्णालयाच्या रक्तपेढीवर अवलंबून राहण्यास सांगण्यात आले.
दरम्यान, राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बहुतांश रक्तपेढ्यांमध्ये आता रक्तघटक विभाजनाची सुविधा उपलब्ध आहे, मात्र एफएफपीचा वापर अल्ब्युमिन, इम्युनोग्लोब्युलिन आणि क्लॉटिंग फॅक्टर्ससारखी औषधे तयार करण्यासाठीही होतो. त्यामुळे त्यातील काही प्लाझ्मा औषधनिर्मिती कंपन्यांना दिला जातो. परिणामी रुग्णांसाठी एफएफपीची उपलब्धता कमी पडू शकते. दुसरीकडे, प्लेटलेट्सचे आयुष्य अवघे चार ते पाच दिवस असल्याने मागणी आणि पुरवठ्याचे नियोजन महत्त्वाचे ठरते. मुदत संपल्यास प्लेटलेट्स वाया जाण्याचीही शक्यता ही त्या अधिकाऱ्याने व्यक्त केली.
४० रक्तपेढ्यांचे परवाने निलंबित
एप्रिल ते ऑक्टोबर २०२६ दरम्यान अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील १९० रक्तपेढ्यांची तपासणी केली. त्यापैकी ४० रक्तपेढ्यांचे परवाने निलंबित, तर पाच रक्तपेढ्यांचे परवाने रद्द करण्यात आले. त्यामुळे रक्तसाठ्याबरोबरच आवश्यक रक्तघटक वेळेत उपलब्ध करून देणारी यंत्रणा सक्षम करण्याचे आव्हान आहे.
मुंबईत ५३ रक्तपेढ्या
मुंबईतील रुग्णालयांमध्ये ५३ रक्तपेढ्या असून, या रक्तपेढ्या त्यांच्या रुग्णांना रक्त राखीव ठेवत असतात. त्यामुळे बाहेरील रुग्णाला कोणी रक्त देत नाही, कारण त्यांना दाखल रुग्णांना रक्त द्यावे लागते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.