दुर्मीळ पुस्तकांचा ठेवा डिजिटल दालनात!

दुर्मीळ पुस्तकांचा ठेवा डिजिटल दालनात!
Published on: 

दुर्मिळ पुस्तकांचा ठेवा डिजिटल दालनात!
वांद्रे येथील नॅशनल लायब्ररीचा स्तुत्य उपक्रम; शंभर वर्षांपूर्वीच्या पुस्तकांचेही डिजिटल जतन
मयूर फडके ः सकाळ वृत्तसेवा,
मुंबई, ता. १५ : सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे वाचन संस्कृती आणि पुस्तकांचे महत्त्व काहीसे कमी होत असल्याची ओरड सतत ऐकू येते, मात्र बदलत्या काळाशी जुळवून घेत पुस्तकांचे सांस्कृतिक आणि वैचारिक मोल जपण्यासाठी वांद्रे येथील नॅशनल लायब्ररीने आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली आहे. ग्रंथालयातील शंभर वर्षांहून अधिक जुन्या आणि दुर्मिळ पुस्तकांचे डिजिटल स्वरूपात जतन करून ती वाचकांसाठी उपलब्ध करण्याचा स्तुत्य उपक्रम संस्थेने हाती घेतला आहे. त्याचबरोबर फिरत्या वाचनालयाच्या माध्यमातून वाचन संस्कृतीचा विस्तारही केला जात आहे.
यंदा १११ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या ग्रंथालयात सुमारे सव्वा ते दीड लाख पुस्तकांचा समृद्ध ग्रंथसंग्रह आहे. वर्ष १८९० पासून आजपर्यंत प्रकाशित झालेल्या विविध विषयांवरील पुस्तकांचा, कादंबऱ्यांचा समावेश आहे. ग्रंथालयाचे प्रमुख कार्यवाहक प्रमोद महाडिक यांच्या संकल्पनेतून २०१६ मध्ये पुस्तकांच्या डिजिटलायझेशनचा विचार पुढे आला. तेव्हापासून आतापर्यंत जवळपास सात हजार पुस्तकांचे डिजिटल स्वरूपात जतन केले आहे. यामध्ये १८९० पासूनचे दुर्मिळ ग्रंथही समाविष्ट आहे. जीर्ण आणि नाजूक पुस्तके वारंवार हाताळल्याने त्यांची झीज होण्याची शक्यता असल्याने त्यांचे डिजिटल जतन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात कै. बाळाराम धुरंधर यांचे १९२८ सालचे श्री तुकाराम महाराज, चिंतामण जोशी यांचे १९६३ सालचे बुद्ध संप्रदाय आणि शिकवण, एकनाथ घोरपडे याचे महात्मा फुले चरित्र व कार्य इ. पुस्तकांचा समावेश आहे. सध्याच्या ऑनलाइन साइट्सवर मराठीतील मोजकी पुस्तके, कादंबऱ्या उपलब्ध आहेत. त्यामुळे जुने दर्जेदार साहित्य नव्या पिढीला त्यांच्या पद्धतीने उपलब्ध होण्यासाठी डिजिटलायझेशन आवश्यक असल्याचे महाडिक यांनी सांगितले.

पुस्तकांचा मूळ बाज जपण्यावर भर
डिजिटलायझेशन करताना पुस्तकातील प्रत्येक पान मूळ स्वरूपातच वाचकांसमोर यावे, याची विशेष काळजी घेतली जाते. त्यामुळे डिजिटल प्रत वाचतानाही दुर्मिळ ग्रंथ हातात घेऊन वाचत असल्याचा अनुभव वाचकांना मिळतो. शासन अनुदानित ग्रंथालय असूनही या उपक्रमासाठी शासनाकडून स्वतंत्र आर्थिक मदत मिळत नसल्यामुळे संस्थेला स्व-खर्चातून हा उपक्रम राबवत आहे. ग्रंथालयाच्या संकेतस्थळावरील अनुक्रमणिकेमधून पुस्तक ग्रंथालयात आहे का, याची माहिती वाचकांना घरबसल्या मिळते.

फिरत्या वाचनालयातून पुस्तकांची सफर
वाचनाची गोडी सर्वसामान्यांमध्ये निर्माण होण्यासाठी फिरत्या वाचनालयाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सुरुवातीला ग्रंथालयाचे कर्मचारी पत्रके वाटून या उपक्रमाची माहिती देत होते. त्यानंतर, मौखिक प्रसिद्धीतून बोरिवली, कांदिवली, दहिसर, जोगेश्वरी, कुर्ला आणि सांताक्रूझ येथून मागणी वाढली. या वाचनालयात सुमारे दोन हजार पुस्तके असून, वाचनालयाचे जवळपास २०० सभासद आहेत. सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये फिरते वाचनालय चालविणारी नॅशनल लायब्ररी ही एकमेव संस्था आहे.

आदिवासी पाड्यांपर्यंत वाचन संस्कृती पोहोचवण्याचा मानस
भविष्यात ई दिवाळी अंक, मासिके आणि विविध पुस्तकांचा संग्रहही वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा संस्थेचा मानस आहे. विशेषतः लहान मुले, वंचित आणि गोरगरीब विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी आदिवासी पाड्यांवर जाऊन मोफत पुस्तक वाचनाचा उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे.

कोरोना काळात मोठा फायदा
कोरोना काळात संकेतस्थळावर शंभर डिजिटल पुस्तके उपलब्ध करून दिल्याने वाचकांना घरबसल्या वाचनाचा आनंद घेता आला. तसेच, गतवर्षी दिल्लीतील एका वाचकाने ग्रंथालयात येऊन मागणी केलेले पुस्तक प्रत्यक्ष संग्रहात उपलब्ध नसतानाही त्याची डिजिटल प्रत छापून देण्यात आली. तंत्रज्ञानाचा वापर करून दुर्मिळ साहित्य वाचकांपर्यंत पोहोचवता येते, हे या उपक्रमातून अधोरेखित झाल्याचे महाडिक यांनी अधोरेखित केले.

तंत्रज्ञानाच्या वाढता युगात पुस्तकांच्या डिजिटलायझेशन उपक्रमाचा वाचनवेड्यांना खूपच चांगला फायदा होत आहे. या माध्यमातून घरबसल्या कुठूनही आपल्या वाचनाची आवड जपू शकतो. परिचित एक परदेशातून डिजिटलायझेशनच्या माध्यमातून पुस्तकांवरती आपली वाचनाची गोडी जपत आहे.
- आशुतोष तावडे, नॅशनल लायब्ररी सभासद.