मुलांना शिक्षा नको, प्रेमाने संवाद साधा!

मुलांना शिक्षा नको, प्रेमाने संवाद साधा!
Published on: 

मुलांना शिक्षा नको, प्रेमाने संवाद साधा!
बालमानसशास्त्रज्ञ डॉ. श्रुती पानसे यांचे पालकांना मार्गदर्शन

मुंबई, ता. १५ : एस. आर. दळवी (आय) फाउंडेशनच्या वतीने बालदिनानिमित्त प्रसिद्ध बालमानसशास्त्रज्ञ आणि मेंदू अभ्यासक डॉ. श्रुती पानसे यांचे ‘पालक-बालक सुसंवाद : मूल समजून घेण्याची नवी दृष्टी’ या विषयावर मोफत ऑनलाइन वेबिनार पार पडले. शनिवारी (ता. १४) झालेल्या या वेबिनारला राज्यभरातील शिक्षक, मुख्याध्यापक, पालक आणि शिक्षणप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी), पुणेच्या सहसंचालक डॉ. कमलादेवी आवटे यांनी शुभेच्छा देताना मुलांमधील वाढता ताणतणाव लक्षात घेता पालक आणि शिक्षकांनी मुलांचे मन समजून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. नवीन शैक्षणिक धोरणात बालकेंद्री व बालस्नेही अध्ययन-अध्यापन आणि मूल्यमापन प्रक्रियेला महत्त्व असल्याचे नमूद करीत त्यांनी फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी फाउंडेशनच्या राज्य उपाध्यक्ष वैशाली काकडे-घुगे यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले. राज्य सचिव नितीन मेमाणे यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या कार्याची आणि वेबिनार आयोजनामागील उद्देशाची माहिती दिली. या वेबिनारमध्ये शीतल बोधले (बीड), रोहिणी माळी (छत्रपती संभाजीनगर) आणि पेंटू म्हैसनवाड (जालना) यांनी मुलाखतकर्ते म्हणून डॉ. पानसे यांच्याशी संवाद साधला. मुलांचे न बोललेले मन कसे ओळखावे, त्यांच्या खेळातून व कृतींतून भावना कशा समजून घ्याव्यात तसेच संवादातून भाषिक व बौद्धिक विकास कसा साधावा, याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. मुलांचा राग, हट्ट, भीती, आक्रमक वर्तन, मोबाईलचा वाढता वापर, डिजिटल शिस्त, सकस आहार आणि मुलांची इतरांशी तुलना टाळण्याचे महत्त्व या विषयांवरही चर्चा झाली. मुलांना शिक्षा करण्याऐवजी त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन प्रेमाने संवाद साधावा. प्रत्येक मुलाची क्षमता वेगळी असल्याने त्याच्या गुणवैशिष्ट्यांनुसार विकासाला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन डॉ. पानसे यांनी केले. सहभागी शिक्षक व पालकांच्या प्रश्नांचेही त्यांनी निरसन केले.


भावनिक विकासही महत्त्वाचा
फाउंडेशनच्या संस्थापिका सीता दळवी यांनी विद्यार्थ्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकासाबरोबर भावनिक विकासही महत्त्वाचा असल्याचे सांगितले. राज्याध्यक्ष रमेश माने यांनी अध्यक्षीय समारोप केला, तर प्रेमचंद अहिरराव यांनी आभार मानले. तांत्रिक व्यवस्थापनासाठी प्रभात बल्लाळ आणि समृद्धी सावंत यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.