

आरे रुग्णालयाची जबाबदारी आता पालिकेवर
३० वर्षांसाठी विनामोबदला हस्तांतरण; दुरुस्ती, नूतनीकरणाचा खर्चही पालिकाच करणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : आरे दुग्ध वसाहतीमधील राज्य सरकारच्या मालकीचे आरे रुग्णालय आणि त्याला लागून असलेली शासकीय निवासस्थाने पुढील ३० वर्षांसाठी महापालिकेच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.
एकूण १,९३२.२० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या या जागेचे हस्तांतरण विनामोबदला होणार असले, तरी रुग्णालयाची दुरुस्ती, देखभाल आणि नूतनीकरणाचा संपूर्ण खर्च पालिकेलाच करावा लागणार आहे. या ठिकाणी दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतर पालिकेमार्फत बाह्यरुग्ण दवाखाना सुरू करण्यात येणार आहे.
आरे परिसरात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र असून आदिवासी पाड्यांसह तुरळक लोकवस्ती आहे. सध्या येथील रुग्णालय राज्य सरकारच्या आरोग्य विभागामार्फत चालविले जाते. मात्र, स्थानिक नागरिकांना पालिकेच्या माध्यमातून आरोग्य सुविधा मिळाव्यात, अशी मागणी लोकप्रतिनिधींकडून सातत्याने करण्यात येत होती. त्यानुसार राज्य सरकारने २०१७ मध्ये रुग्णालयाची इमारत आणि संलग्न निवासस्थाने पालिकेकडे हस्तांतरित करण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर ११ जून २०२५च्या शासन निर्णयानुसार ३० वर्षांसाठी जागा हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
रुग्णालयाची १,२५७.९० चौरस मीटर आणि संलग्न शासकीय निवासस्थानांची ६७४.३० चौरस मीटर जागा पालिकेला मिळणार आहे. मात्र, या हस्तांतरणामुळे इमारतींची मालकी पालिकेकडे जाणार नसून, कराराची मुदत संपल्यानंतर जागा आणि इमारती शासनाला आहे त्या स्थितीत परत कराव्या लागणार आहेत. तसेच संरचनात्मक परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट), दुरुस्ती आणि नूतनीकरण पालिकेला स्वखर्चाने करावे लागणार आहे. इमारतीचा ताबा मिळाल्यानंतर पाहणी व आवश्यकतेनुसार स्ट्रक्चरल ऑडिट करून अंदाजपत्रक तयार केले जाईल. त्यानंतर मंजुरी घेऊन दुरुस्तीची कामे करण्यात येतील. दवाखान्यात सर्वसाधारण तपासणी, औषध वितरण, प्रयोगशाळा तपासण्या, क्षयरोग नियंत्रण, लसीकरण तसेच माता-बाल आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. मानवी हक्क आयोगानेही रुग्णालयाच्या दुरवस्थेप्रकरणी कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. सुधार समितीचा २४ जून २०२६ चा ठराव क्रमांक २५ निकाली काढण्यात आला असून, प्रस्तावाला सुधार समिती आणि महापालिकेची मंजुरी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.