

शिवशाही पीएमएवाय अंतर्गत १० हजार घरे उभारणार
पहिल्या टप्प्यात कल्याण, अंबरनाथला पसंती; राज्यस्तरीय नियंत्रण समितीची प्रस्तावाला मंजुरी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी शिवशाही पुनर्वसन प्रकल्प लिमिटेडने कंबर कसली आहे. त्यानुसार शिवशाही आता प्रधानमंत्री आवास योजना (पीएमएवाय २.०) अंतर्गत १० हजार घरे उभारणार आहे. पहिल्या टप्प्यात कल्याण तालुक्यात पाच हजार आणि अंबरनाथ तालुक्यात पाच हजार घरे उभारली जाणार असून, त्याला राज्यस्तरीय नियंत्रण समितीने मंजुरी दिली असून, राज्य सरकार आता त्याबाबत केंद्राकडे शिफारस करणार आहे.
शिवशाहीकडून कल्याण-डोबिवली महापालिका क्षेत्रात समूह पुनर्विकास प्रकल्प राबणार असून, त्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी गेला आहे. त्यानंतर आता त्यांनी पीएमएवाय अंतर्गत घरे उभारण्यावर भर दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात कल्याण आणि अंबरनाथ या दोन शहरांची निवड करण्यात आली आहे. कल्याण येथे ६० एकर जागेवर पाच हजार घरे तर अंबरनाथ येथे ३० एकर जागेवर पाच हजार घरे उभारली जाणार आहेत. ही सरकारी जमीन केवळ एक रुपया प्रति एकर या नाममात्र दराने प्रकल्पासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
३३२ चौरस फुटांचे क्षेत्रफळ, १९ लाख रुपयांची किंमत
शिवशाहीकडून पीएमएवाय अंतर्गत २३ मजली इमारती उभारल्या जाणार असून, त्यामध्ये ३३२ चौरस फुटांचे चटई क्षेत्रफळ असणार आहे. सदर घरांच्या किमती सुमारे १९ लाख रुपयांच्या घरात असतील, असे शिवशाहीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, या इमारतींचे बांधकाम दर्जेदार केले जाणार असून, येथे आधुनिक सुविधा, लिफ्ट, पाणी, वीज आणि रस्ते यांसारख्या पायाभूत सुविधांसह ही घरे विकसित केली जाणार आहेत.
१९ नोव्हेंबरला केंद्राची बैठक
पीएमएवाय अंतर्गत आलेल्या प्रस्तावाबाबत १९ नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारची बैठक होणार आहे. त्यामध्ये राज्य सरकारकडून गेलेल्या शिवशाहीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. केंद्राकडून मंजुरी मिळताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार असून, बांधकामासाठी स्वतंत्र एजन्सी नेमली जाणार आहे. त्यासाठी डिसेंबर महिन्यात निविदा काढण्याचे शिवशाहीचे नियोजन आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.