महापालिकेच्या जमिनींची खिरापत

महापालिकेच्या जमिनींची खिरापत
Published on: 

महापालिकेच्या जमिनींची खिरापत
चारकोपचा भूखंड ट्रस्टला, तर लोअर परळची मोक्याची जागा विकसकाला देण्याचा प्रस्ताव; ३० वर्षांच्या भाडेपट्ट्याची तयारी, जमीनवाटप धोरणावर प्रश्न
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : महापालिकेच्या मालकीचे कोट्यवधी रुपये किमतीचे दोन भूखंड दीर्घकाळ खासगी संस्थांच्या ताब्यात देण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. चारकोप सेक्टर २ येथील शाळेचा ४,२०९.७० चौरस मीटरचा भूखंड सेंट मेरी एज्युकेशनल ट्रस्टला, तर लोअर परळ येथील चाचणी व प्रयोगशाळेसाठी आरक्षित असलेला ५,१६६.०६ चौरस मीटरचा भूखंड खासगी विकसकाला ३० वर्षांच्या भाडेपट्ट्याने देण्याचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. दोन्ही प्रकरणांत पुढील ३० वर्षांसाठी मुदतवाढ देण्याची तरतूदही आहे. त्यामुळे महापालिकेच्या मौल्यवान जमिनींच्या दीर्घकालीन खासगी वापराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
चारकोप येथील शाळेची इमारत म्हाडाने महापालिकेला दिली असून, त्यातील १९ वर्गखोल्या १९९५ पासून सेंट मेरी एज्युकेशनल ट्रस्ट वापरत आहे. संस्था नियमित भाडे भरत असल्याने पुनर्विकासासाठी पात्र ठरल्याचा प्रशासनाचा दावा आहे. महापालिकेच्या २०२४ मधील धोरणानुसार स्पर्धात्मक निविदा न मागवता राखीव किमतीवर २५ टक्के अधिक रक्कम आकारून हा भूखंड देण्याचे प्रस्तावित आहे. त्याची राखीव किंमत तीन कोटी २७ लाख ७२ हजार रुपये असून, २५ टक्के अधिक रक्कम धरून अधिमूल्य सुमारे चार कोटी नऊ लाख ६६ हजार रुपये निश्चित केले आहे. वार्षिक भुईभाडे केवळ ४,२१० रुपये असेल.
दुसरीकडे, लोअर परळमधील महापालिकेच्या चाचणी व प्रयोगशाळेच्या भूखंडावरील ‘इतर संस्था’ हे आरक्षण हटविण्याची प्रक्रिया सुरू आहे. विकास आराखडा २०३४ मधील आरक्षण महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमाच्या कलम ३७ अंतर्गत हटवून जागा खासगी विकसकाला भाडेपट्ट्याने देण्याचा प्रस्ताव आहे. या भूखंडाचे आधारभूत मूल्य ४५५ कोटी रुपये निश्चित केले होते. निविदेत दोन विकसक सहभागी झाले, मात्र बोलींच्या तक्त्यात स्कायस्टीड कन्स्ट्रक्शन्सची बोली ४४० कोटी, तर स्कायलार्कची ४५९ कोटी रुपये नमूद असताना, पुढील मजकुरात ४७० कोटींच्या व्यवहाराचा उल्लेख आहे. त्यामुळे प्रस्तावातील आकड्यांबाबत विसंगती आहे. विकसकाला स्वतःच्या खर्चाने १,२९९ चौ.मी.ची नवीन प्रयोगशाळा बांधून द्यावी लागणार आहे.

जमीनवाटप धोरणावर प्रश्न
दोन्ही प्रस्तावांना सुधार समिती आणि महापालिकेची मंजुरी आवश्यक आहे. चारकोपमध्ये खुल्या निविदांऐवजी एका संस्थेला भूखंड देण्याचा पर्याय, तर लोअर परळमध्ये आरक्षण हटवून मोक्याची जागा दीर्घकाळ खासगी वापरासाठी देण्याचा निर्णय यामुळे महापालिकेच्या जमीनवाटप धोरणावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.