

आरोग्य संस्थांवर आता एआयची नजर
कोल्हापुरात राज्यातील पहिल्या प्रकल्पाचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : सार्वजनिक आरोग्य संस्थांतील आरोग्यसेवांची गुणवत्ता, पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्याच्या उद्देशाने कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या ‘महा-पल्स एआय’ प्रकल्पाचे उद्घाटन सोमवारी कोल्हापूर येथे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थांच्या कामकाजावर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून देखरेख ठेवण्यात येणार आहे.
कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत या प्रकल्पासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली होती. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या पुढाकाराने तसेच आयआयटी मंडी या नामांकित तंत्रशिक्षण संस्थेच्या तांत्रिक सहकार्याने या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात आली. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य सेवांत कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रत्यक्ष वापर करणारा हा राज्यातील पहिला जिल्हास्तरीय प्रकल्प ठरला.
‘महा-पल्स एआय’च्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील एकूण १०४ शासकीय आरोग्य संस्थांना जिल्हा कमांड सेंटरशी जोडण्यात आले. यामध्ये एक सामान्य रुग्णालय, पाच उपजिल्हा रुग्णालये, १५ ग्रामीण रुग्णालये आणि ८३ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील शहरी तसेच दुर्गम ग्रामीण भागातील आरोग्य संस्थांच्या कामकाजावर एकाच ठिकाणाहून देखरेख ठेवणे शक्य झाले. जिल्हा कमांड सेंटरमध्ये सर्व १०४ आरोग्य संस्थांमधील माहिती, अलर्ट, महत्त्वाच्या घटनांचे अहवाल आणि त्यावर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा एकाच डॅशबोर्डवर उपलब्ध होण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
रुग्णालयांच्या कामकाजावर देखरेख
या प्रणालीद्वारे रुग्णालयांमधील डॉक्टरांची उपस्थिती, रुग्णांची गर्दी, रांग व्यवस्थापन, स्वच्छता, हाऊसकीपिंग तसेच आपत्कालीन घटनांवर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून लक्ष ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली. आपत्कालीन अलर्ट पाठविण्याची सुविधाही उपलब्ध झाली. तसेच बाह्यरुग्ण विभागातील गर्दी, प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या आणि सरासरी प्रतीक्षा वेळ यांचेही विश्लेषण या प्रणालीद्वारे करण्यात येणार होते.
तंत्रज्ञानाद्वारे सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण
प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची आवश्यकता नव्हती. आरोग्य संस्थांत आधीपासून उपलब्ध असलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेचाच वापर करून कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानाद्वारे फुटेजचे विश्लेषण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.