

दिवाळीत एसटीला पाच कोटींचे उत्पन्न
परळ आगाराची सर्वाधिक कमाई; मुंबई सेंट्रल दुसऱ्या क्रमांकावर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची वाढलेली गर्दी एसटी महामंडळाच्या पथ्यावर पडली आहे. २०२६ च्या दिवाळी हंगामात मुंबई विभागातील पाच आगारांनी मिळून तब्बल पाच कोटी २९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. यामध्ये परळ आगाराने सर्वाधिक एक कोटी ८७ लाख ८९ हजार रुपयांची कमाई करीत अव्वल स्थान पटकावले आहे. त्याखालोखाल कुर्ला आणि मुंबई सेंट्रल आगारांचा क्रमांक लागतो.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गावी जाणाऱ्या आणि सुट्टीनंतर मुंबईत परतणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने जादा गाड्यांचे नियोजन केले होते, मुंबई विभागातील परळ आगाराने या काळात सर्वाधिक उत्पन्न मिळवून आघाडी घेतली. परळ आगाराला एक कोटी ८७ लाख ८९ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. कुर्ला आगाराने एक कोटी चार लाख ५७ हजार रुपये, तर मुंबई सेंट्रल आगाराने ९१ लाख ८५ हजार रुपयांचा महसूल मिळवला. उरण आगाराने ८८ लाख ७४ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले असून, पनवेल आगाराला ५६ लाख सहा हजार रुपयांची कमाई झाली आहे. अशा प्रकारे मुंबई विभागातील पाच आगारांनी एकत्रितपणे पाच कोटी २९ लाख ११ हजार रुपयांचा महसूल मिळवला आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांना वाहतूक सुविधा उपलब्ध करून देतानाच उत्पन्नवाढीतही मुंबई विभागाने योगदान दिले आहे.
प्रवाशांनी नेहमीच ‘लालपरी’ला पसंती दिली आहे, दिवाळीतही चांगला प्रतिसाद मिळाला, यामध्ये सर्वसामान्य प्रवाशांची दिवाळी गोड करण्यासाठी घरापासून दूर राहून अहोरात्र कष्ट करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे.
- अभिजित पाटील, विभाग नियंत्रक, मुंबई विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.