

भगवती रुग्णालयाच्या
खासगीकरणास विराेध
शिवसेना ठाकरे गट-मनसेचा संयुक्त माेर्चा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : सरकार मुंबईतील रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, रस्ते, पदपथ, मैदाने आणि उद्यानांसारख्या सार्वजनिक सुविधाही खासगी संस्थांच्या ताब्यात देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबईकरांच्या मालकीच्या या सुविधा कोणत्याही परिस्थितीत खासगी हातात जाऊ दिल्या जाणार नाहीत, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी दिला. भाजपची सत्ता असलेल्या शहरात, तालुक्यात किंवा प्रभागात धूळ आणि अव्यवस्था नसलेला विकास दाखवून द्यावा, असे आव्हानही भाजपला त्यांनी दिले.
महापालिकेच्या भगवती रुग्णालयाचे सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर खासगीकरण करण्याच्या निर्णयाविरोधात सोमवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संयुक्त मोर्चा काढण्यात आला. या वेळी आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकार आणि भाजपवर सार्वजनिक सुविधांच्या खासगीकरणावरून जाेरदार टीका केली.
मुंबई महापालिकेच्या मालमत्ता आणि सार्वजनिक सुविधा या मुंबईकरांच्या मालकीच्या आहेत. त्यामुळे त्या खासगी संस्थांच्या ताब्यात देण्याचा निर्णय अमान्य आहे. यापूर्वीही मुंबईतील एका महापालिका शाळेचा कारभार एका न्यासाकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला होता; मात्र विरोधानंतर प्रशासनाला तो निर्णय मागे घ्यावा लागला होता, असेही त्यांनी नमूद केले.
मोर्चानंतर दाेन्ही पक्षांच्या नेत्यांच्या संयुक्त शिष्टमंडळाने भगवती रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर जाऊन प्रशासनाला निवेदन सादर केले.
-----
विविध कामांनिमित्त
वारंवार खाेदकाम
मुंबईतील रस्ते कधी गॅसवाहिन्या, कधी पाणीवाहिन्या, तर कधी अन्य कामांच्या नावाखाली वारंवार खोदले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. रस्ते बांधणीसाठी प्रस्तावित असलेल्या सहा हजार ८० कोटी रुपयांच्या खर्चाचा उल्लेख करताना, विरोधानंतर ही रक्कम कमी करून पाच हजार कोटी रुपयांवर आणण्यात आल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.