

रस्ते धुण्यासाठी २१३ टँकर!
पाणीटंचाईमुळे विरोधी पक्षनेत्यांचा विरोध
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ ः मुंबईवर पाणीटंचाईचे सावट असताना रस्ते धुण्यासाठी २१३ टँकर कशासाठी, असा सवाल मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे. टँकर लॉबीला अभय देण्याचा प्रयत्न थांबवा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, मुंबईतील रस्ते धुण्यासाठी २१३ टँकर रस्त्यावर उतरविण्याचे नियोजन केले आहे. ३७७ रस्त्यांची निवड करून सुमारे ६६७ किलोमीटर रस्ते १५० ते १५९ दिवस पाण्याच्या टँकरने धुण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समोर आले आहे. धुळीमुळे होणारे वायुप्रदूषण रोखणे आवश्यक असले तरी त्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेवर आणि भविष्यातील पाणी नियोजनावर परिणाम होणार नाही, याची प्रशासनाने घ्यावी अशी सूचना त्यांनी केली आहे.
काही ठिकाणी टँकरचालकांकडूनच अनधिकृत पाणीउपसा होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. एल निनोचा परिणाम पुढील सप्टेंबरपर्यंत राहण्याची शक्यता व्यक्त होत असेल आणि पुन्हा कमी पाऊस झाला तर २०२७ मध्येही पाणीटंचाईचे संकट निर्माण होऊ शकते. त्यामुळे आजपासूनच काटेकोर पाणी नियोजन करणे गरजेचे आहे. समुद्राच्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करण्याचा प्रकल्प हा भविष्यातील एक पर्याय असला तरी त्यातून मिळणारे पाणी आणि त्याचे वितरण याच्या मर्यादा लक्षात घेतल्या पाहिजेत. केवळ या प्रकल्पावर अवलंबून राहून मुंबईची पाण्याची गरज भागणार नाही, असेही विरोधी पक्षनेत्या पेडणेकर यांनी म्हटले आहे.
विहिरींचे पुनरुज्जीवन करा
मुंबईतील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जुन्या विहिरी आणि बोअरवेलचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी विकासकामांच्या आणि बांधकामांच्या नावाखाली बिल्डर लॉबीने जुन्या विहिरी बुजवल्याच्या तक्रारी आहेत. या विहिरींची माहिती संकलित करून त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी महापालिका पुढाकार घेणार आहे का, सत्ताधारी आणि प्रशासनामध्ये यासाठी इच्छाशक्ती आहे का, असा सवाल विरोधी पक्षनेत्या पेडणेकर यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.