मालमत्ता कराची आठवण आता व्हॉट्सॲपवर!

मालमत्ता कराची आठवण आता व्हॉट्सॲपवर!
Published on: 

मालमत्ता कराची आठवण आता व्हॉट्सॲपवर!
एक कोटी ३४ लाखांहून अधिक संदेश पाठविण्याचे नियोजन; स्थायी समितीसमोर प्रस्ताव
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी मुंबई महापालिका आता डिजिटल माध्यमांचा वापर करणार आहे. मालमत्ताधारकांना कर भरण्याची सूचना, थकबाकीची माहिती आणि वेळोवेळी स्मरणपत्रे पाठवण्यासाठी व्हॉट्सॲप बिझनेस आणि गुगल मेसेजेस (आरसीएस) प्रणालीचा आधार घेतला जाणार आहे. यासाठी तीन वर्षांच्या कालावधीसाठी दोन कोटी तीन लाख तीन हजार ५२९ रुपयांचे कंत्राट देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. येत्या २० नोव्हेंबरला होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर मंजुरीसाठी चर्चा होणार आहे.
महापालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागामार्फत ही डिजिटल संदेशप्रणाली राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून मालमत्ताधारकांना मालमत्ता कराची देय रक्कम, थकबाकी आणि कर भरण्याच्या मुदतीबाबत थेट संदेश पाठविण्यात येतील. त्यामुळे करदात्यांपर्यंत वेळेत माहिती पोहोचविण्यासोबतच करवसुलीची प्रक्रिया अधिक गतिमान करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
या कामासाठी केंद्र सरकारच्या जीईएम पोर्टलवर ई-निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यात विदर्भ इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड, रूट मोबाइल लिमिटेड आणि स्थापन कन्सल्टंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या तीन कंपन्यांनी सहभाग घेतला. तांत्रिक छाननीत तिन्ही कंपन्या पात्र ठरल्या, मात्र आर्थिक निविदेत विदर्भ इन्फोटेकने सर्वांत कमी दर सादर केल्याने या कंपनीला कंत्राट देण्याची शिफारस करण्यात आली आहे.
निर्धारित वेळेत काम पूर्ण न केल्यास दंडाची तरतूदही करण्यात आली आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास मालमत्ता कराच्या वसुलीसाठी महापालिकेला थेट डिजिटल संपर्काचे नवे माध्यम उपलब्ध होणार आहे.

प्रत्येक संदेशासाठी ३५ पैसे
प्रस्तावानुसार, तीन वर्षांत एक कोटी ३४ लाखांहून अधिक संदेश पाठविण्याचे नियोजन आहे. प्रत्येक संदेशासाठी ३५ पैसे आणि त्यावर १८ टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. प्रणाली विकसित करणे, संदेश पाठविणे, तांत्रिक मदत आणि तीन वर्षे देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी कंत्राटदारावर राहणार आहे. कार्यादेश मिळाल्यानंतर ३० दिवसांत प्रणाली कार्यान्वित करणे बंधनकारक असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.