

दोघांच्या भांडणात तिसरा जखमी
लोकलमध्ये चाकूहल्ला; प्रवासी गंभीर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : लोकलमधील दोन प्रवाशांचा वाद इतका विकोपाला गेला की, त्याची किंमत तिसऱ्याच प्रवाशाला मोजावी लागली. प्रतिस्पर्ध्याला लक्ष्य करून फलाटावरून डब्यात भिरकावलेला चाकू दरवाजाजवळ उभ्या असलेल्या प्रवाशाच्या छातीत घुसल्याची घटना रविवारी (ता. १५) अंधेरी स्थानकात घडली. यामध्ये सुरेश द्वारका शर्मा गंभीर जखमी झाले.
झारखंडमधील हजारीबाग येथील मूळ रहिवासी असलेले शर्मा गेल्या दोन वर्षांपासून धारावी येथे राहतात. सुतारकाम करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. १५ नोव्हेंबरला कामानिमित्त बोरिवली पूर्व येथे गेलेले शर्मा काम आटोपून सकाळी ११.५८ वाजता चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या अप जलद लोकलमध्ये चढले. पहिल्या सर्वसाधारण डब्यात दरवाजाजवळ उभे राहून ते प्रवास करत होते. याच डब्यात मागील बाजूस बसलेल्या दोन प्रवाशांमध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. त्यानंतर दोघांमधील शाब्दिक वादाचे रूपांतर शिवीगाळीत झाले. दुपारी १२.१२ वाजता लोकल अंधेरी स्थानकात थांबताच त्यापैकी एक प्रवासी फलाटावर उतरला, तर दुसरा डब्यातच राहिला, मात्र फलाटावर उतरलेल्या प्रवाशाचा राग शांत झाला नव्हता. लोकल फलाट सोडताच त्याने डब्यातील प्रतिस्पर्ध्याला लक्ष्य करून चाकू भिरकावला, मात्र चाकू दरवाजाजवळ उभ्या असलेल्या शर्मा यांच्या छातीत घुसला. दोघांच्या भांडणाशी कोणताही संबंध नसलेल्या शर्मांना नाहक या हिंसक प्रकाराचा फटका बसला.
सहप्रवाशांची मदत
चाकू छातीत घुसल्याने शर्मा गंभीर जखमी होऊन डब्यात कोसळले. सहप्रवाशांनी तातडीने आपत्कालीन साखळी ओढत त्यांना मदत केली. लोकल वांद्रे स्थानकात पोहोचल्यानंतर रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या (एमएसएफ) जवानांनी मदतीसाठी धाव घेतली. शर्मांना स्थानक व्यवस्थापक कार्यालयात प्राथमिक उपचार दिल्यानंतर भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आरोपी अटकेत
अंधेरी रेल्वे पोलिसांनी शिवाजी लक्ष्मण गायकवाड याला अटक केली आहे. तो नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील रहिवासी असून, विनातिकीट प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटना अंधेरी रेल्वे पोलिसांच्या हद्दीत घडल्याने वांद्रे रेल्वे पोलिसांनी प्रकरण अंधेरी रेल्वे पोलिसांकडे वर्ग केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.