१.९७ कोटींचा अन्नसाठा जप्त

१.९७ कोटींचा अन्नसाठा जप्त
Published on: 

१.९७ कोटींचा अन्नसाठा जप्त
विनालेबल सुपारीसह खजूर जप्त
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : अन्नपदार्थांच्या साठवणुकीतील अनियमितता, चुकीचे लेबलिंग आणि प्रतिबंधित घटकांच्या वापराविरोधात अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर धडक कारवाई केली आहे. या मोहिमेत १.९७ कोटी रुपयांहून अधिक किमतीचा अन्नसाठा जप्त करण्यात आला असून, चार परवाने निलंबित आणि पाच विक्रेत्यांचे व्यवसाय बंद करण्यात आले आहेत. नवी मुंबईतील खजूर-दालचिनीच्या गोदामावर टाकलेल्या छाप्यात १.११ कोटी रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील श्री साधक स्टॉकेज (फ्रेश मॅक्स) या गोदामात एफडीएने तपासणी केली. या वेळी सहा ब्रँडचे ७१ हजार ७६२ किलो ओले खजूर आणि २५ हजार ८१६ किलो कॅसिया-दालचिनी असा एकूण ९७ हजार ५७८ किलो साठा आढळला. त्याची किंमत एक कोटी ११ लाख तीन हजार ९०४ रुपये आहे. गोदामात ओली, फाटलेली आणि पाक गळणारी पोती जमिनीवर ठेवण्यात आली होती. आयातदाराचा तपशील, उत्पादन व मुदत दिनांक तसेच बॅच क्रमांकाबाबतही त्रुटी आढळल्या. पालघर येथे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दोन ट्रकमधून ५९ हजार ४९६ किलो विनालेबल सुपारी जप्त करण्यात आली. या साठ्याची किंमत ६८ लाख ७१ हजार ७८८ रुपये आहे. दोन्ही वाहनांमधील सुपारीच्या गोण्यांवर लेबल आणि बॅच क्रमांक नसल्याने हा साठा जप्त करून सील करण्यात आला. मुंब्रा येथील सागर स्वीट अँड बेकरीच्या दोन आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. मिठाई, मावा, तूप, वनस्पती, तेल, सूजी, साखर आणि मैदा यांसह चार लाख ५८ हजार रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त करण्यात आला. उल्हासनगर येथील वाहेगुरू ट्रेडर्समधूनही १००.८ किलो फ्रूट फ्लेवर्ड कँडी जप्त करण्यात आली.

पेढीचा परवाना निलंबित
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे स्वामी समर्थ मंदिर परिसरातील मिठाईविक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा संस्थानच्या पेढीचा मैसूरपाक नमुना प्रयोगशाळेच्या तपासणीत असुरक्षित घोषित झाल्याने पेढीचा परवाना निलंबित करण्यात आला. पुण्यातील खाऊ गल्लीत पाच खाद्यपदार्थविक्रेत्यांना वैध अन्न परवाना नसल्याने व्यवसाय बंद करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.