स्पाइसजेटचे १२ उड्डाणे रद्द

स्पाइसजेटचे १२ उड्डाणे रद्द
Published on: 

स्पाइसजेटचे १२ उड्डाणे रद्द
अनेक विमानांना विलंब; प्रवाशांचे हाल
मुंबई, ता. १८ : आर्थिक संकट आणि परिचालनविषयक अडचणींचा सामना करणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानसेवेला मोठा फटका बसला आहे. स्पाइसजेटची मंगळवारी मुंबईतून नियोजित १२ उड्डाणे रद्द केली, तर अनेक विमानांना विलंब झाला. सोमवारी सायंकाळी सातनंतर स्पाइसजेटचे एकाही विमानाचे उड्डाण न झाल्याने अनेक प्रवाशांना विमानतळावर ताटकळत राहावे लागले.
मुंबई विमानतळावर स्पाइसजेटच्या विमानांच्या उड्डाणाबाबत वेळेवर माहिती दिली जात नसल्याने, सुधारित वेळापत्रक स्पष्ट होत नसल्याने तसेच बोर्डिंग पास मिळण्यास विलंब होत असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. काही प्रवाशांनी स्पाइसजेटच्या काउंटरसमोर घोषणाबाजी केली. या घटनेचे व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित झाले आहेत. दिल्लीला जाणारे एसजी-५११ हे रात्री ११.२० वाजताचे विमान साडेचार तासांच्या विलंनानंतर पहाटे ३.५४ वाजता रवाना झाले. दुसरीकडे बंगळूरला जाणारे एसजी-६७६ आणि दुबईला जाणारे एसजी-५११३ ही उड्डाणेही रद्द करण्यात आली. दरभंगाला जाणारे विमान ऐनवेळी रद्द झाल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. स्पाइसजेटच्या ताफ्यातील कमी विमानसंख्या, कर्मचारी टंचाई आणि वेतन विलंबामुळे परिचालनावर परिणाम होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, मंगळवारच्या गोंधळाबाबत स्पाइसजेटने अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
---
५,५०० कोटींचा निधी उभारणार
आर्थिक आणि परिचालनविषयक अडचणींचा सामना करणाऱ्या स्पाइसजेट या विमान कंपनीने आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ५,५०० कोटी रुपयांपर्यंत निधी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. नव्या निधीमुळे कंपनीची आर्थिक स्थिती मजबूत करणे, विमानसेवेची क्षमता पुन्हा वाढविणे आणि व्यवसायाला नव्याने गती देणे, हे उद्दिष्ट असल्याचे कंपनीने निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.