
नबाबकालीन पोलिस वसाहतींची दुरवस्था
मुरूड, ता. १२ (बातमीदार) ः मुरूड नवाबकालीन पोलिस वसाहतीची दुरवस्था झाली आहे. छतातून पाणी गळत असून समुद्रालगत असल्याने लोखंड गंजले आहे. भिंतीचे प्लास्टर निखळले असून स्वच्छतागृहाचीही दैना झाली आहे. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांची गैरसोय होते.
वसाहतीत एकूण ४७ खोल्या आहेत, मात्र त्यापैकी केवळ १३ ते १४ ठिकाणीच पोलिसांचे कुटुंबे वास्तव्यास आहेत. निखळलेले दरवाजे, पडक्या भिंती, सरपटणारे प्राणी, तसेच उंदीर, घुशींचा परिसरात वावर वाढला आहे. इलेक्ट्रिक फिटिंग नसल्याने रात्री-बेरात्री स्वच्छतागृहाचा वापर करणे अवघड बनले आहे. त्यामुळे रहिवाशांची कुचंबना होते.
पोलिस चाळीत सुविधांची वानवा असल्याने वृद्ध माता-पित्यांना इच्छा असली तरी याठिकाणी आणू शकत नसल्याची व्यथा काहींनी खासगीत मांडली. पिण्याच्या पाण्याचाही पुरेशा प्रमाणात पुरवठा होत नसल्याने रहिवाशांची ओढाताण होते. वसाहतीत एकूण ६ चाळी असल्या तरी सुमद्रालगतच्या १० निवासस्थानांपैकी केवळ ४ खोल्यांमध्ये, तर १० कुटुंबे कारागृहालगतच्या चाळीत राहत आहेत.
पुनर्बांधणीची मागणी
शंभर वर्षांहून अधिक जुन्या पोलिस चाळींची बऱ्याच वर्षांपासून देखभाल-दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे त्या जीर्ण झाल्या असून ठिकठिकाणी पडझड झाली आहे. येथील ट्रान्स्फॉर्मरची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे आहे. त्याचबरोबरच मोडकळीस आलेली पोलिस वसाहत नव्याने बांधण्याची मागणी रहिवाशांकडून होत आहे.
मुरूड पोलिस कर्मचारी वसाहत दुरुस्तीबाबत बांधकाम विभागाकडून अंदाजपत्रक काढले आहे. त्याचबरोबरच जिल्ह्यातील इतर कर्मचारी वसाहतीच्या देखभाल-दुरुस्तीबाबत प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यात आला आहे.
- अतुल झेंडे, अप्पर पोलिस अधीक्षक, रायगड
मुरूड - नवाबकालीन पोलिस वसाहतीची दुरवस्था झाली आहे.