
एक दिवस वन्यजीवांसाठी
मुरूड, ता. ४ (बातमीदार) : फणसाड वन्यजीव अभयारण्यातील परिमंडल नांदगावतर्फे श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय यशवंतनगर, नांदगाव या विद्यालयात जागतिक वन्यजीव दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी परिमंडल अधिकारी आदेश पोकळ यांच्या अध्यक्षतेखाली आठवी, नववीच्या विद्यार्थ्यांना फणसाड अभयारण्यातील जैवविविधतेची माहिती दिली. तसेच अभयारण्य ते काही दुर्मिळ पक्षी व प्राणी यांच्याविषयी विस्तृत माहिती दिली.
प्राण्यांची किंवा जंगली वनस्पतीची जपणूक करणे महत्त्वाचे असल्याचे सांगून शेकरू, बिबटे, रानडुक्कर, गवा, सांबर, प्राण्यांचे रक्षण करणे आपले कर्तव्य असल्याने वन्यजीवांची शिकार करू नका, असे आवाहन आदेश पोकळ यांनी केले. वन्य जीव व पक्ष्यांच्या वसती स्थानाला धोका पोहचतो. वणवे लागू नये, यासाठी विविध उपाययोजना आखण्यात येतात. जंगल भागात कुठेही वणवा लागला असेल, तर वन खात्यास त्वरित कळवण्याची विनंती त्यांनी केली. यावेळी वनसंरक्षक अरुण पाटील, वनमजूर दिनेश गाणार, पर्यवेक्षक श्रीधर ओव्हाळ, सागर राऊत व शिक्षक उपस्थित होते.
फणसाड अभयारण्यालगत आम्ही राहतो. जैवविविधतेने नटलेले हे फणसाड ५४ चौ.कि.मी. क्षेत्रात व्यापलेले आहे. या निसर्गरम्य परिसरात वनक्षेत्र विभागाच्या सर्तकतेमुळे आणि वणवा रेषा काढल्यामुळे गेल्या चार वर्षांत आग लागण्याचा एकही प्रकार न घडल्याने वनसंपदा व वन्यजीव सुरक्षित आहे.
- उत्तम वाघमोडे, मुख्याध्यापक