
मुरूड आगारात नादुरुस्त बस
मुरूड (बातमीदार) : मुरूड आगारातील सर्व प्रवासी बसेस या जीर्ण व नादुरुस्त आहेत. त्याचा प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ऑक्टोबरपासून मागणी करूनही विभाग नियंत्रक, पेण येथून मुरूड आगाराला नवीन प्रवासी बस दिल्या जात नाहीत. परिणामी, उपलब्ध असलेल्या जुन्या बसचे ब्रेक डाऊनचे प्रमाण वाढत आहे.
रायगडचे विभाग नियंत्रक या विषयाकडे दुर्लक्ष करत असून त्यांच्या निषेधार्थ पद्मदुर्ग व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष अरविंद गायकर हे २० मार्चपासून मुरूड तहसील कार्यालयासमोर उपोषण बसणार आहेत. याबाबतचे रीतसर निवेदन गायकर यांनी जिल्हाधिकारी रायगड, जिल्हा पोलिस अधीक्षक, विभाग नियंत्रक रामवाडी पेण, मुरूड पोलिस ठाणे, मुरूड तहसीलदार व मुरूड आगार व्यवस्थापकांना दिले आहेत. आठ वर्षांपासून मुरूड आगाराला नवीन बस दिल्या नाहीत. मुरूड आगाराची प्रवासी वाहतूक ही जुन्याच बसवर सुरू आहे. ज्याचा त्रास तालुक्यातील प्रवाशांना होत आहे. गाड्या जुन्या झाल्याने वेग मर्यादा, टायर पंक्चर होणे, पाटे तुटणे या घटनांना सामोरे जावे लागते. वेळोवेळी निवेदन मागणी होऊनही नवीन बस मिळत नाहीत. या कारणांमुळे उपोषणाला बसावे लागत असल्याची खंत गायकर यांनी निवेदनात व्यक्त केली. मुरूड आगारातील निवेदन कार्यशाळा उपअधीक्षक मंगेश पाटील यांनी स्वीकारले आहे.