
आगामी निवडणुकीत जिल्हा परिषद जिंकणारच
मुरूड, ता. ३० (बातमीदार) ः रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाचा एक उमेदवार वगळता शिवसेना-भाजपच्या आमदारांची संख्या सर्वाधिक आहे. नवीन सरकार सत्तेवर आल्यापासून ग्रामीण भागासह शहरी भागासाठी मोठ्या प्रमाणात विकासनिधी प्राप्त झाला असून कामेही सुरू आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत जिल्हा परिषद नक्कीच जिंकू, असा विश्वास आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केला आहे.
नांदगाव येथील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते उस्मान रोहेकर, मुरूड तालुका प्रमुख ऋषिकांत डोंगरीकर, नांदगावचे माजी सरपंच विलास सुर्वे, मुरूड तालुका संघटक दिनेश मिणमिणे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजा केणी, जिल्हा उपप्रमुख भारत बेलोसे, दामोदर राऊत आदी उपस्थित होते.
कार्यकर्त्यांनी तळागाळातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी सतर्क राहावे. राजकीय हेवेदावे न करता अधिकाधिक विकासकामांवर भर द्यावा. गरजू व नडलेल्यांची कामे करून जनतेच्या कामांना प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी मेळाव्यात केले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांच्या प्रश्नांचेही त्यांनी निरसन केले. या मेळाव्यासाठी विलास सुर्वे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या रचना कवळे यांनी महिला
बचत गटाच्या सदस्यांसह शिवसेनेत पक्ष प्रवेश केला.