मुरुड तालुक्याच्या सर्वंकष विकासासाठी शिकस्त करणार

मुरुड तालुक्याच्या सर्वंकष विकासासाठी शिकस्त करणार
Published on

मुरुड तालुक्याच्या सर्वंकष विकासासाठी शिकस्त करणार
आमदार महेंद्र दळवी यांची ग्वाही
मुरुड, ता. ३ (बातमीदार) : आघाडी शासन काळात अडीच वर्ष कुठलाच निधी मिळवता आला नव्हता. शासन बदलताच शिंदे- फडणवीस सरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून साळाव- आगरदांडा रस्त्यासाठी ३२ कोटींचा निधी प्राप्त झाला. मुरुड- साळाव रस्ता पर्यटनासाठी मोठा अडसर होता. हा प्रदीर्घ रखडलेला रस्ता येत्या ६० दिवसांत पूर्ण करू. तसेच या रस्त्याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मंत्री रवींद्र चव्हाण यांना आवर्जून उपस्थित करू. मुरुड तालुका हा पर्यटनावर अवलंबून आहे. तेव्हा या तालुक्याच्या सर्वंकष विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांनी केले.
नांदगाव हायस्कूलमध्ये साळाव-आगरदांडा रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रमात आमदार दळवी पंचक्रोशीतील जाहीर कार्यक्रमात मागदर्शन करताना बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रायगडचे खासदार सुनील तटकरे, भाजपचे वरिष्ठ नेते ॲड. महेश मोहिते, आमदार महेंद्र दळवी, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष भरत बेलोसे आदी भाजप, शिंदेगट व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात महेंद्र दळवी यांनी खासदार सुनील तटकरे यांनाच लोकसभेची उमेदवारी मिळेल आणि माझ्या मतदारसंघात तटकरे यांना मतांची आघाडी मिळेल, असे सांगून भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांना नामोल्लेख करीत महायुतीतर्फे तटकरे यांच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा दिला. प्रास्ताविकात भरत बेलोसे यांनी साळाव-आगरदांडा रस्त्याची दुरवस्था झाली होती. पर्यटकांसह स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती. यावेळी आमदारांनी रस्त्यासाठी निधी दिल्याने ही समस्या कायमची मिटली. याबद्दल आमदार दळवी यांचे आभार मानले. ॲड. महेश मोहिते यांनी केंद्रात नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांत पायाभूत विकासाची कामे केली. कोकणपट्ट्यात रो-रो सेवा, जंगल जेट्टी व सागरी महामार्गाची सुविधा राज्य शासनातर्फे करण्यात येईल, असा निर्वाळा दिला. तर अध्यक्षीय भाषणात खासदार सुनील तटकरे यांनी पर्यटन व्यवसाय चांगल्याप्रकारे विकसित झाला तर स्थानिकांना मुंबई, पुणे येथे रोजगारासाठी स्थलांतरित होण्याची आवश्यकता राहणार नाही. कोकणच्या विकासाचे दार महायुतीने उघडले असल्‍याचे सांगितले. तसेच सागरी महामार्गाचे बॅ. अंतुले यांचे स्वप्न ४४ वर्षानंतर पूर्ण होणार आहे. तसेच मुरुड हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जगातील मोजक्या पर्यटन केंद्रापैकी एक असेल. साळाव- आगरदांडा रस्त्याचे भूमिपूजन ही त्याची नांदी असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com